ठाणे : अमली पदार्थांच्या सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर आळा घालण्याच्या प्रयत्नात ठाणे पोलिसांना यश येताना दिसत आहे. मागील दीड वर्षांत ठाणे पोलिसांनी तब्बल ३० कोटी रुपयांहून अधिकचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. तसेच, ५ हजार ७७८ जणांना सेवन आणि विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई करताना परराज्यात छापे टाकून अमली पदार्थ निर्मिती करण्याचे कारखाने देखील उद्धवस्थ केले. जप्त केलेल्या साठ्यामध्ये एमडी, चरस, कोडीन पावडर यासारख्या महागड्या अमली पदार्थांचाही सामावेश आहे.
ठाणे जिल्हा हा रायगड, मुंबई उपनगर, पालघर जिल्ह्याला जोडणारा आहे. त्यामुळे महामार्ग, मार्गाचे जाळे जिल्ह्यात पसरले आहे. याचाच गैरफायदा घेऊन विविध भागातील तस्कर ठाणे शहरात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येत असतात. अमली पदार्थांच्या सेवनाला आणि विक्रीला आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती केली जात होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांमध्ये ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ सेवन आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ विरोधी पथकासह ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून तब्बल ३० कोटी २६ लाख ५४ हजार ८२३ रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. यापैकी २०२४ मध्ये १७ कोटी ४२ लाख ५४ हजार ५३६ इतका साठा जप्त केला. तर यावर्षी ३० जून पर्यंत झालेल्या कारवाईत १२ कोटी ८४ लाख २८७ रुपयांचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये जवळपास सर्वच अमली पदार्थांचा साठा आहे. या कारवाईत पोलिसांनी उत्तरेकडील राज्यात जाऊन तेथे उभारण्यात आलेले कारखानेच उद्धवस्थ केले. या कारवाईमुळे अमली पदार्थ विशेषत: एमडी पावडर बनविणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटक केली. त्यामुळे अमली पदार्थाचे मूळच बंद करणे पोलिसांना शक्य झाले.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. तसेच सेवन आणि विक्रीचा प्रयत्न करणाऱयांना अटक केली. काही प्रकरणात पोलिसांनी परराज्यात जाऊन कारवाई केली. तसेच तेथील अमली पदार्थ तयार करण्याचे कारखाने उद्धवस्थ केले. अमली पदार्थांवर आळा बसावा यासाठी जनजागृती देखील केली जात आहे. – राहुल मस्के, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे पोलीस.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ कारवाई
अमली पदार्थ – किंमत
१) गांजा – ३,७२,८२,३९९२) हायब्रिड गांजा – २३,७८,२२०
३) हर्बल गांजा – २,२०,०००४) चरस – १,३१,७७,२००
४) चरस तेल- १३,५०,०००५) एमडी- ८,७८,३३,५५०
६) हॅश ऑईल – १,५०,७०,०००७) कफ सिरप आणि नशेच्या गोळ्या- ७,५३,१६७
८) कोकेन- ११,००,०००९) इतर अमली पदार्थ आणि एलएसडी पेपर – ५०,५०,०००
१०) ब्राऊन शुगर – ५,२०,०००११)एमडीएमए- ९५,२०,०००
एकूण – १७,४२,५४,५३६
१ जानेवारी ते ३० जून २०२५ कारवाई
अमली पदार्थ – किंमत
१) गांजा- ९६,३६,२५०२) हायब्रिड गांजा – २९,००,०००
३) हायड्राॅ गांजा – ३,९०,०००४) चरस – ४४,६२,०००
५) एमडी – ८,५८,५८,४९३६) कफ सिरप आणि नशेच्या गोळ्या – ४७,९१,४८४
७) कोकेन – २,८४,९६०८) एमडीएमए पावडर – ३७,१००
९) कोडीन पावडर – २,००,४०,०००एकूण – १२,८४,००,२८७