Thane News : ठाणे : गणेशोत्सवाचा कालावधी सुरु असतानाच ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बंदूकीसह शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच उत्तरप्रदेशातील जोगिन्दर राजभर (२७) याला अटक केली असून त्याच्याकडून शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरु आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत ठाणे पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेश मंडप, गणेश विसर्जन घाट येथे स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गुन्हे अन्वेषण शाखेची पथके यासह मुख्यालय, राज्य राखीव दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात आहेत.

ठाणे शहर आयुक्तालयात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात बेकायदा अग्नीशस्त्र खरेदी विक्री करणाऱ्यांना तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्यानुसार, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी विशेष मोहीमेद्वारे कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना केल्या होत्या. दरम्यान, परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रशांत कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास अधिकारी, अंमलदारांची पथके तयार केली होती. काही दिवसांपूर्वीच पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष पोटे यांना घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल परिसरात एक जण बंदूक घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

अन् अशी झाली अटक

साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष पोटे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर कासारवडवली पोलिसांच्या पथकाने नागलाबंदर सिग्नल परिसरात सापळा रचून जोगिन्दर राजभर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडील लाल रंगाच्या बॅगमध्ये देशी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन, दोन काडतुसे असा साठा मिळून आला. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याने हा साठा विक्रीसाठी आणला होता अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

कारवाई पथक

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष पोटे, उपनिरीक्षक नितीन हांगे, सुनील सुर्यवंशी, पोलीस अंमलदार जगदीश पवार, जयसिंग रजपुत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी केली असून या प्रकरणाचा तपास मनीष पोटे हे करत आहेत.