ठाणे : ठाणे शहरात शिंदेची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. यातूनच काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवून शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. अशाचप्रकारे बुधवारी रात्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदेच्या शिवसेनेचे ठाण्यात राजन विचारे यांच्याविरोधात बॅनर लावले होते. हे बॅनर हटविण्यासाठी पोलिस आल्याने शिंदेच्या युवासेनेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी विरोध केल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाली.
शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाणे शहर ओळखले जाते. पक्ष फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातील अनेक आमदार आणि नगरसेवकांनी पाठींबा दिला. तर, माजी खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठींबा दिला. तेव्हापासून शिंदे विरुद्ध विचारे गटात आरोपप्रत्यारोपाची लढाई सुरू आहे. अशातच राजन विचारे यांनी एक वादग्रस्त विधान केल्याचा दावा करत शिंदेच्या युवा सेनेने त्यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यापाठोपाठ त्यांचे शहरात बॅनरही लावले. त्यापैकी काही बॅनर विचारे यांच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले तर, लुईसवाडी भागतील बॅनर काढण्यासाठी पोलिस गेले. त्यावेळी शिंदेच्या युवासेनेचे कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण होते.
बॅनरवरील मजकूर
‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही. आज या घटनेला शंभर दिवस झाले, २७ कुटुंब उध्वस्त झाली आहेत आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज? असे राजन विचारे यांनी विधान केले होते. त्यातील ‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का’ या विधानाचा निषेध करण्यासाठी शिंदेच्या युवा सेनेने विचारेंविरोधात बॅनर लावले होते. त्यात विचारे यांच्या फोटोवर फुल्ली मारण्यात आली होती. तर, निषेध, निषेध.. उबाठाच्या अशा देशद्रोही राजनचा धिक्कार. ना आदर, ना विचार, मनात आहेत फक्त ‘अ’ विचारे असा मजकूर बॅनरवर होता.
बॅनर अखेर फाडला
ठाण्याचा लुईसवाडी परिसरात राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेला बॅनर काढण्यासाठी पोलिस गेले होते. याबाबत माहिती मिळताच शिंदेच्या युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. याठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी बॅनर काढण्यास विरोध केला. परंतु पोलिसांनी हा बॅनर उतरविताच कार्यकर्त्यांनी हा बॅनर खेचून फाडला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.