मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी अखेर एका तरूणाचा जीव घेतला. रांजनोली पूलाजवळ खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या तरूणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रिजेशकुमार जैस्वार असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी डम्पर चालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर येथे ब्रिजेशकुमार जैस्वार राहत होते. शनिवारी त्यांना भिवंडी येथील मानकोली भागातील पारसनाथ कंपाऊंड येथे कामानिमित्ताने जायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या रामजनक शर्मा यांना संपर्क साधून दुचाकी घेऊन येण्यास सांगितले. दुपारी दोघेही दुचाकीवरून पारसनाथ कंपाऊंड येथे आले. कामे आटोपून घरी परतत असताना त्यांची दुचाकी रांजनोली नाका येथे आली. परंतु येथील वाहतूक अतिशय संथ सुरू होती. त्यामुळे चालक रामजनक हे दुचाकी काहीशी मुख्य रस्त्याच्या खाली घेऊन चालवित होते. दरम्यान त्याचवेळी रस्त्यावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. या खड्डयामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या एका डम्परखाली ब्रिजेशकुमार आले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.