ठाणे : दहा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि सामूहिक एकतेने साजरा झालेला गणेशोत्सव आता निरोपाच्या तयारीत आहे. यंदा ठाण्यात ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला पारंपरिक टाळ-मृदंग आणि ढोलकी, भजन, कीर्तनाच्या गजरात निरोप देण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करीत पारंपारिक वेशभुषेत मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तसेच मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत.
ठाणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देखावे उभारण्यात येतात. या मंडळांकडून गणेश मुर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकांमध्ये ढोल – ताशे, डिजे आणि बॅन्जोचा दणदणाट करण्यात येतो. याशिवाय, गुलाल उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. अशा मिरवणुकांमुळे शहरातील ध्वनी प्रदुषणाच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याचे दरवर्षीच्या आकडेवारीतून समोर येते. असे असले तरी काही मंडळांकडून आदर्शवत अशा पारंपारिक वेशभुषेत मिरवणुका काढल्या जातात.
यंदा शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक आणि भक्तीमय वातावरणाचा विचार करून डीजे संस्कृतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ठाण्यातील अनेक मंडळांच्या मिरवणुका या भजन, कीर्तन आणि पारंपरिक वाद्यात निघणार आहेत. आझाद नगर नं २, उथळसर, सावरकर नगर, वागळे, लोकमान्य नगर, ठाणे पूर्व अशा अनेक ठिकाणी मिरवणुकीत भजन-कीर्तन सोहळे आयोजित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे यंदा अनेक मंडळांनी संकल्पनेवर आधारित सजावट केली होती. त्यामुळे त्यानुसार विसर्जन मिरवणुकीमध्ये सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण केली जाणार आहे.
वागळे इस्टेट येथील जय भवानी मित्र मंडळाच्या मिरवणुकीमध्ये पर्यावरणाविषयी, सामाजिक संदेश देणारे फलक तसेच वारकरी हे टाळ, मृदुंग वाजवत, भजन करीत मिरवणुकीत सामील होणार आहेत. उथळसर नगर येथील शिवगर्जना मित्र मंडळाच्या मिरवणुकीत पारंपारिक वेशभुषा, भजन, कीर्तन केले जाणार आहे. सावकरनगर येथील ओंकारेश्वर सार्वजनिक मंडळाने दिंडीचे आयोजन केले आहे. आझाद नगर नं २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे तलावपाळी पर्यंत वारकऱ्यांची दिंडी, टाळ वाजवत मिरवणुक काढणार आहेत. ठाणे पूर्व येथील शिवसम्राट मित्र मंडळाची मिरवणुक पारंपारिक पद्धतीत आणि पारंपारिक वेशभुषेत निघणार आहे. या मंडळात यंदा गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण केली जाणार आहे. तसेच स्वच्छता मोहिम, वृक्षरोपन, रक्तदान शिबिरात सहभागी व्हा असा संदेश देण्यात येणार आहे.