Central Railway News : ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. लाखो प्रवासी येथून दररोज मुंबई, ठाणे पल्ल्याडची शहरे आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मध्य रेल्वेचे अनेकदा रखडलेले वेळापत्रक, गर्दीमुळे होणारे प्रवाशांचे हाल यामुळे प्रवासी त्रस्त असताना आता ठाणे रेल्वे स्थानकात नव्या समस्येने डोके वर काढले आहे. सोमवारी मुसळधार पावसादरम्यान, स्थानकातील गळक्या छप्परमधून धबधब्यासारखे कोसळणारे पाणी पाहून सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर लाईव्ह (social media live) करत उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवत रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष वेधले. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

ठाणे शहरातून मुंबई तसेच नवी मुंबई शहरात कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत.त्यामुळे विविध शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात ये-जा करतात. त्यामुळे ठाणे स्थानकातून लाखो प्रवासी दिवसाला वाहतुक करतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवाशांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसून तो कागदावरच असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. या प्रश्नांकडे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
नवे छत उभारण्यात आले.

फलाट पाचवरुन मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. तर, फलाट सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. यामुळे दोन वर्षांपुर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने या फलाटाची रूंदी वाढविली होती. रूंदीकरण केलेल्या फलाटावर पावसापासून बचावासाठी तात्पुरते बांबूचे ताडपत्रीचे छत उभारण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी बांबूचे छत काढून त्या भागात पत्र्याचे छत उभारले गेले.

रेल्वे प्रशासनाकडून नवीन पर्यटनस्थळ

मध्य रेल्वेचे अनेकदा रखडलेले वेळापत्रक, गर्दीमुळे होणारे प्रवाशांचे हाल यामुळे प्रवासी त्रस्त असताना आता ठाणे रेल्वे स्थानकात नव्या समस्येने डोके वर काढले आहे. सोमवार सकाळपासून पाऊस सुरू होता. दुपारी पावसाचा जोर वाढला. ठाणे स्थानाकातील फलाट क्रमांक दोन वरील छताच्या पत्र्यातुन पावसाचे पाणी धबधब्यासारखे कोसळत होते. हे चित्र पाहून ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी थेट सोशल मीडियावर लाईव्ह करत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. ” ठाणे स्टेशन रेल्वे प्रशासनाकडून नवीन पर्यटन स्थळ उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांना धबधब्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर प्लॅटफॉर्म नंबर दोन वर पोहोचा”, असा उपरोधित टोला लगावत डोंगरे यांनी संताप व्यक्त केला.