ठाणे – मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांपैकी एक असणाऱ्या ठाणे स्थानकात दोन वर्षापुर्वी प्रवाशांसाठी भव्य प्रतिक्षालय उभारण्यात आले होते. गाडी उशिरा असल्यास गाडी येईपर्यंत प्रवाशांना येथे प्रतिक्षा करता येत होती. मात्र, सद्यस्थितीत पाहता सुधारणा कामासाठी प्रतिक्षालय अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे प्रतिक्षालयाचीच प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र ठाणे स्थानकात दिसून येत आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्ववभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात विविध सुविधांची उभारणी करण्यात येत असते. याच अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा आरखडा तयार करण्यात आला होता. यानुसार रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील १० रेल्वे स्थानकांच्या विकास कामांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करून प्लॅटफॉर्म लेव्हल, रूफ प्लाझा, तळमजला अधिक २ दोनमजली इमारत तयार करून विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला होता.

ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन येथे मुंबईच्या दिशेने प्रतिक्षलाय आहे. मात्र, ते प्रतिक्षालय स्थानकापासून काही अंतर लांब असल्याने प्रत्यक्षात स्थानकात उपनगरीय गाड्यांची आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशस्त अशा जागेची गरज होती. याच पार्श्वभूमीवर स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर प्रशस्त प्रतिक्षालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. २०२३ मध्ये जून महिन्यात प्रवाशांसाठी प्रतीक्षालय खुले करण्यात आले होते. या प्रतिक्षलायचा आवार अत्यंत मोठ्या स्वरूपाचे आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नसल्यानेच मागील वर्षी समोर आले होते. मात्र, सद्यस्थितीत या प्रतिक्षालयात विविध सुधारणांच्या कामासाठी ते बंद ठेवले असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात अस्वच्छता झाली असून प्रतिक्षालय केव्हा खुले होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक दोन वरून प्रामुख्याने कल्याण, कर्जत, कसारा या ठिकाणी जाणाऱ्या धिम्या गतीच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक होते. तर, फलाट पाच सहा आणि सात आठ वरून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते. त्यातही बहुतांश वेळा विविध कारणांमुळे उपनगरीय गाड्या उशिराने धावत असतात. त्यामुळे अशावेळी या प्रतिक्षालयात प्रवाशांना थांबणे सोयीस्कर जाते. मात्र, हे प्रतिक्षालय काही काळापासून कामासाठी बंद असल्याचे चित्र आहे.

ठाणे स्थानक हे मुंबई शहर आणि उपनगरातील मध्यवर्ती शहरापैकी एक आहे. या स्थानकाला ऐतिहासिक असे स्थान आहे. या स्थानकातील काम धिम्या गतीने होत असेल तर इतर स्थानकांबाबत काय अपेक्षा करावी. ठाणे स्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. अनेकदा या गाड्या उशिराने धावतात. अशावेळी फलाटावर प्रवाशांना थांबणे गैरसोयीचे होते. त्यासाठी प्रतिक्षालय अत्यावश्यक आहे. तरी रेल्वे प्रशासनाने ती लवकरात लवकर पुर्ण करावी.- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्षालयात विविध सुधारणा केल्या जात आहेत. किमान एक महिन्यात हे काम पुर्ण करून प्रतिक्षालय प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल.- पी. डी पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे