कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेतर्फे आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा विचार करून योग वर्ग चालविले जातात. भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, कल्याण तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवरील सामाजिक महिला, पुरूष कार्यकर्ते हे योग वर्ग घेतात. या योग शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून दहमहा मिळणारे सुमारे बारा हजार रूपयांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून मिळाले नसल्याने योग शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मागील दीड ते दोन वर्षापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून या योग शिक्षकांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्याची आवड असणारे गाव पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते योग शिक्षक म्हणून गाव, आदिवासी पाड्यांवर जाऊन गावातील रहिवाशांना दररोज सकाळी एकत्र करून योगाचे वर्ग घेतात. यामध्ये गावातील तरूण, ज्येष्ठ, वृध्द, महिला, पुरूष सहभागी होतात. एक तास हा वर्ग दररोज चालतो.
गाव परिसरातील चार ते पाच किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाडे, गावांमध्ये जाऊन हे योग शिक्षक सकाळी सात ते आठ या वेळेत वर्ग घेतात. यासाठी ते रिक्षा, स्वताचे खासगी वाहन वापरतात. यासाठी इंधन लागते. सकाळच्या वेळेत योग केल्याने आरोग्य सुस्थितीत राहत असल्याने गावातील शेतकरी, कष्टकरी महिला या योग वर्गात सहभागी होतात. या योग वर्गामध्ये महिन्यातून एकूण २४ तासिका योग शिक्षकांनी घ्यायच्या असतात. एका तासिकेचे योग शिक्षकाला जिल्हा परिषदेकडून ५०० रूपये मानधन म्हणजे महिन्याला सुमारे बारा हजार रूपयांपर्यंत रक्कम मिळते.
डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील योग शिक्षकांना ही मानधनाची रक्कम मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून अनुदान आले नाही. अनुदानाची नस्ती मंजुरीसाठी पाठवली आहे, अशी कारणे योग शिक्षकांना पंचायत समिती कार्यालयातून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मिळत आहेत. काम करूनही मानधन मिळत नसल्याने योग शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दिवाळीमध्ये मानधन न मिळालेल्या योग शिक्षकांना मानधन मिळेल असे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नियंत्रकांकडून सर्व योग केंद्र चालविणाऱ्या विभागप्रमुखांना निरोप देण्यात आले होते. दिवाळीत मानधन मिळणार असल्याने योग शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. आता दिवाळी सरली तरी मानधन खात्यात जमा होत नसल्याने योग शिक्षक त्रस्त आहेत. अनेक शिक्षकांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन विचारणा केली. तेव्हा त्यांना अद्याप अनुदान आले नाही. आले की तात्काळ आपल्या खात्यात वर्ग केले जाईल, अशी उत्तरे दिली जात आहेत.
योग वर्ग बंद
निधीची चणचण आणि इतर तांत्रिक कारणांमुळे मागील दोन वर्षापासून आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले योग वर्ग मागील सात महिन्यांपासून म्हणजे एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. योग वर्ग बंद झाल्याने योग शिक्षक, आणि दररोज सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम होत असल्याने समाधानी असलेले ग्रामस्थ नाराज झाले आहेत.
योग शिक्षकांच्या मानधनाची नस्ती मंजूर झाली आहे. ही नस्ती ई प्रणालीच्या माध्यमातून प्रक्रियेला जाईल आणि योग शिक्षकांना मानधन मिळेल. – डाॅ. अमोल वाघ, आरोग्यवर्धिनी केंद्र नियंत्रक.
