भाईंदर :- ठाणे लोकसभा जागेवर शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यामुळे मिरा भाईंदर भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याचा थेट फटका महायुतीच्या प्रचारावर होणार असल्याची शक्यता आहे.

ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद पाहता ही जागा आपल्या वाटेलाच यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून मागील काही दिवसापासून आक्रमकपणे करण्यात येत होती. तर मिरा भाईंदर भाजप पक्षाने शिवसेना उमेदवारासाठी काम करणार नसल्याचे थेट जाहीर केले होते. त्यामुळे या जागेवरून भाजप- शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची जोरदार चर्चा होती.

हेही वाचा – विरारमध्ये मिसळ दुकानाला भीषण आग, आगीत दुकान जळून खाक; शहरात आग दुर्घटना सुरूच

अखेर ही जागा शिवसेनेला स्वतःकडे ठेवण्यात यश आले असून नरेश म्हस्के यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा झाल्यानंतर मिरा भाईंदर भाजपच्या गोट्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. इतकेच नव्हे तर सक्रिय कार्यकर्ते एकत्र जमत असून पुढील निर्णय घेण्यासाठी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघत आहे.

ठाणे लोकसभेसाठी भाजपतर्फे संजीव नाईक हे इच्छुक होते. गेल्या काही दिवसातच त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढत पहिल्या टप्प्यातील प्रचार देखील पूर्ण केला होता. त्यामुळे नाईकच हे आगामी निवडणूक लढवणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र एकाएकी शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यामुळे भाजपात नाराजी पसरली आहे.

हेही वाचा – नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे या क्षेत्रातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपचाच उमेदवार असावा, अशी जनसामान्य नागरिकांची इच्छा आहे. त्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा ठाणे वगळता नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमध्ये जनसंपर्क नसल्यामुळे मोठा फटका बसणार असल्याची शक्यता भाजपच्याच एका वरिष्ठ नगरसेवकाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या पक्षाचा उमेदवार असावा अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यानुसारच मिरा भाईंदरमधील कार्यकर्ते मागणी करत होते. मात्र आता शिवसेनाचा उमेदवार जरी घोषीत झाला असला तरी महायुतीधर्म सर्वोपरी अशी भावना मनात ठेवून पूर्ण ताकदीने उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी काम करणार आहोत.” – किशोर शर्मा – जिल्हाध्यक्ष ( मिरा भाईंदर भाजप )