ठाणे: शनिवारी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करत पलावा येथील कोंडीवर भाष्य केले होते. त्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने राजू पाटील यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेला व्हिडिओ आणि त्यावर भावूक झालेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा एका भाषणातील व्हिडिओ एकत्र करत डॉ. शिंदे यांची खिल्ली उडवली आहे.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली भीषण वाहतूक कोंडी नागरिकांच्या नाकीनऊ आणत आहे. या रस्त्यावर तासनतास अडकून बसणाऱ्या प्रवाशांच्या संतापाला आता राजकीय वळण मिळाले आहे. शनिवारी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर पलावा चौकातील भीषण कोंडीचा व्हिडिओ पोस्ट करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. या टीकेला उत्तर म्हणून ठाकरेंच्या सेनेनेही श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल केला असून, सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर राजू पाटील यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेला व्हिडिओ आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या एका भाषणातील भावूक झालेल्या व्हिडिओला एकत्र करत खिल्ली उडवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यावर, “खासदारांनी केलेला मतदारसंघाचा विकास…

कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल!” असेही लिहिले आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू असून त्यावर अनेक वाहनचालक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी गोपाळकाला निमित्त डोंबिवलीत आलेल्या आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी येथील पुलाबद्दल छेडले होते. त्यावेळी या पुलाची पाहणी करण्यासाठी स्वतंत्रपणे येणार असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे यावर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. आदित्य ठाकरे यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेने अधिकृतपणे पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कोंडीचे संकट वाढले

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्याने रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. विशेषतः पलावा चौकाजवळ दररोज संध्याकाळी आणि सकाळी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिका तासनतास अडकून पडत आहेत. वाहतुकीच्या व्यवस्थापनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याचा आरोप स्थानिक नागरिक वारंवार करत आहेत.