मराठी नववर्षनिमित्ताने ठाण्यातील कौपिनेश्वर न्यास तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी तीन ते चार नव्या उपयात्रांची भर पडली आहे. नेहमी स्वागत यात्रेच्या दिवशी घोडबंदर आणि कळवा भागातून उपयात्रा काढण्यात येत होती. परंतू, स्वागत यात्रेविषयी होत असलेली जनजागृती आणि करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यामुळे यंदा नागरिकांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मुख्य यात्रेसह शहरातील कळवा, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर आणि लोढा या भागातूनही उपयात्रा निघणार आहे, अशी माहिती न्यासतर्फे देण्यात आली.

करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यामुळे दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. या स्वागतयात्रेला तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे यंदाच्या वर्षी शहरातील विविध संस्थांनी, गृहसंकुलांनी स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत शहरातील प्रत्येक भागातील नारिकांनी एकत्र येऊन पारंपारिक पद्धतीने करावे यासाठी मुख्य यात्रेसह उपयात्रा काढण्यात येतात. जेणेकरुन वेगवेगळ्या भागातून एकत्र येण्यापेक्षा त्या त्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन मराठी नववर्षाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत आणि यात्रेच्या माध्यमातून सामाजिक – सांस्कृतिक संदेश नागरिकांना द्यावा हा यामागचा मुळ उद्देश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी घोडबंदर आणि कळवा येथून उपयात्रा काढण्यात येत असते. या नववर्षस्वागत यात्रेविषयी होत असलेली जनजागृती आणि यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद यामुळे यंदाच्या वर्षी शहरातील विविध पाच भागातून उपयात्रा काढण्यात येणार आहेत. कळवा, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर आणि लोढा या भागातून उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासतर्फे देण्यात आली. यंदाच्या वर्षी यात्रेचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर असल्यामुळे संस्थांचाही उत्साह वाढला आहे. वैज्ञानिक किंवा सांस्कृतिक – सामाजिक विषयावर संकल्पना घेऊन रथ साकारण्याची जोरदार तयारी संस्थांनी सुरु केली आहे.