ठाणे : येथील खोपटमधील सिंगनगरमध्ये क्लस्टर विकास योजनेअंतर्गत रहिवाशांवर दबावतंत्र वापरले जात असून क्लस्टरबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसतानाच काही व्यक्तींनी रहिवाशांकडून जबरदस्तीने ॲफिडेव्हिटवर सह्या घेतल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायासाठी धाव घेऊन त्याच्यापुढे व्यथा मांडल्या.
एकीकडे एसआरए योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरू असतानाच, दुसरीकडे खोपट येथील सिंगनगरमध्ये क्लस्टर योजनेची माहिती न देता रहिवाशांवर दबावतंत्र अवलंबले जात असल्याचा आरोप करत रहिवाशांनी याप्रकरणी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. रहिवाशांनी सह्यांचे निवेदन देत क्लस्टर योजनेबाबत पारदर्शकता राखावी आणि दबावतंत्र थांबवावे, अशी मागणी केली. यावर प्रतिसाद देताना आमदार केळकर म्हणाले, “रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवू,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
एसआरए योजनांमध्ये विकासकांची मुजोरी सर्वश्रुत आहे. आता क्लस्टर योजनांमध्येही विकासकांच्या लोकांनी रहिवाशांवर दबाव आणणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी मी सतत जागरूक आहे आणि सिंगनगरमधील रहिवाशांना न्याय मिळवून देईन, असे आमदार केळकर म्हणाले. दरम्यान, धर्मवीरनगरमधील इमारतींच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबतही रहिवाशांनी आमदार केळकर यांच्याकडे तक्रार केली. संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन केळकर यांनी बीएसयुपी विभागाचे अधिकारी मोहन कलाल यांच्याशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आमदार केळकर यांचा सत्कार
पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली सात वर्षे किमान वेतन व योग्य बोनस मिळत नसल्याची बाब आमदार केळकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या संदर्भात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चौकशीची मागणी केली होती. अलीकडे झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना आता किमान वेतनासह १० ते १५ हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाची ठरणार असून त्यांनी शुक्रवारी झालेल्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात आमदार केळकर यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, तसेच अमित सरैय्या, महेश कदम आणि योगेश भंडारी उपस्थित होते.