Thane News : ठाणे : ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना कळवा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना गंभीर त्रुटी केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलातील नऊ पोलीस कर्मचारी निलंबित झाले. असे असतानाच आता, भिवंडीत बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात एकूण १५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील ५ आरोपींना भिवंडी न्यायालय येथे ४ ऑगस्ट रोजी ५ आरोपी हजर करण्यासाठी ठाणे पोलिसांनी पथक नेमले होते. यातील महिला पोलीस शिपाई संगिता अशोक चोखंडे यांच्याकडे एस.एल.आर. रायफल आणि ५० जिवंत काडतुसे देण्यात आली होती तर, पोलीस शिपाई विकास प्रेमराव चाटे यांच्याकडे तीन बेडी देण्यात आल्या होत्या. हे पथकाच्या ताब्यात असलेल्या आरोपीमध्ये भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या सलामत अली अन्सारी (३२ ) याचा समावेश होता.

सलामत हा भिवंडीतील फेणेगावात राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील मधुबन जिल्ह्याचा रहिवाशी होता. त्याला पथकाने न्यायालयात हजर केले असता, तो गर्दीचा फायदा पोलिसांच्या रखवलीतून पळून गेला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे पोलीस निलंबित

आरोपीवर आणि त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले नाही आणि कायदेशीर रखवालीतून पळून गेला. यामुळे कर्तव्यावर सतर्क न राहता निष्काळजीपणा आणि हालगर्जीपणाचे कृत्य करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्र.३ (तीन) चे उल्लंघन केले आहे, असा ठपका पथकातील ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार अमोल बाळासो तरटे, पोलीस शिपाई मोतीराम दत्ता ढेबरे, पोलीस शिपाई दत्ता बबनराव सरकटे, पोलीस शिपाई दिपक शिवदास इंगळे, पोलीस शिपाई विकास प्रेमराव चाटे, महिला पोलीस शिपाई संगिता अशोक चोखंडे यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी ही कारवाई केली आहे.

याआधी नऊ पोलीस निलंबित

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सात न्यायबंदींना ४ ऑगस्टला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होते. त्यासाठी ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. साध्या वेशात एका पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, तपासणीत सात पैकी दोन कैदी आढळून आले नाहीत. मात्र, चौकशीत समजले की ते फरार झाले नव्हते, तर त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले होते, जे नियमांचे उल्लंघन होते.

संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करून सांगितले की ते न्यायबंदी एक्स-रे रूममध्ये किंवा स्वच्छतागृहात आहेत. दरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांच्या ठिकाणाविषयी टाळाटाळ आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने अधिकाऱ्यांना संशय निर्माण झाला होता. हे दोन्ही कैदी नंतर पोलिसांना आढळून आले. सर्वांना पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात परत आणण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर पोलीस उपायुक्त डाॅ. पवन बनसोड यांनी नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबित केले होते.