ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पूणे यांच्या वतीने राज्यभर रविवारी, २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून १७ हजार ०३३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.
टीईटी म्हणजे शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा आहे.

उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे, शैक्षणिक ज्ञानाचे तसेच बालविकास आणि शैक्षणिक मानसशास्त्राचे मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत ही परीक्षा बंधनकारक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देणे हा तिचा उद्देश आहे.

ठाणे जिल्ह्यातील परिक्षेसाठी पेपर-I साठी ७ हजार ८०३ आणि पेपर-II साठी ९हजार २३० उमेदवारांनी अर्ज केला आहे. पेपर-I सकाळी १०.३० ते दुपारी १.०० आणि पेपर-II दुपारी २.०० ते ४.३० या वेळेत होईल. उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रांची पाहणी करून बैठक व्यवस्था व सुविधा तपासल्या आहेत.

परीक्षा नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था

परीक्षा आयोजन आणि संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तयारीचा आढावा घेत मार्गदर्शन केले. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर आणि बायोमेट्रिक तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला असून सर्व परीक्षा केंद्रांशी सातत्याने संपर्क ठेवला जाणार आहे.

सर्व उमेदवारांनी वेळेत केंद्रावर पोहोचावे व नियमांचे पालन करावे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सुरक्षा, आसनव्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. – बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), ठाणे जिल्हा परिषद.