ठाणे : दिवा आणि मुंब्रा या शहरातील अनधिकृत बांधकामांना चाप बसावा यासाठी ठाणे महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची निर्मिती केली आहे. दिवा आणि मुंब्रा शहरातील अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी असून शहानिशा तसेच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही. मात्र, अधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, रिक्त इमारत, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई झाली असून २४ गुन्हे दाखल झाले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले. तसेच, अनेक अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. या इमारती तातडीने रिक्त कराव्यात. त्याचा ताबा पुन्हा रहिवाशांनाच दिला जाईल, असा विश्वास तेथील नागरिकांना द्यावा, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.