ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पोलिस ठाण्यांच्या परिसरातील आणि बस आगारांमधील भंगार वाहनांबरोबरच त्याठिकाणी पडलेल्या वाहनांच्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊन साथरोग पसरण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांसह बसआगार प्रमुखांना नोटीसा दिल्या असून त्यात भंगार वाहनांमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डास उत्पत्तीसाठी पाण्याची साठवणुक आणि कचरा यामुळे होते. शहरात वाहन टायर पंक्चरची दुकाने, रहिवास क्षेत्रात टायर, नारळ करवंट्या आणि बांधकामाच्या ठिकाणी खोदलेले खड्डे यामध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या डासांमुळे डेंग्यु, मलेरिया अशा आजारांची साथ पसरते. पावसाळ्यात उद्भवणारे आजार रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका दरवर्षी शहरातील वाहन टायर पंक्चरची दुकानांना नोटीसा बजावते. याशिवाय, निर्माणधीन बांधकाम प्रकल्पांनाही नोटीसा बजावते. तसेच झोपडपट्टी भागात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घरांच्या छतावर टायर, नारळाच्या करवंट्या आणि रिकामे डबे ठेवू नका अशा सुचना करण्यात येतात.

यंदाही पालिकेने अशाचप्रकारच्या नोटीसा बजावल्या आहेत. असे असले तरी शहरातील पोलिस ठाण्यांबाहेर विविध गुन्ह्यात जप्त केलेली तसेच अपघातग्रस्त वाहने ठेवण्यात येतात. यातील अनेक वाहने ही वर्षोनुवर्षे तिथेच उभी असल्याने भंगार होतात. अपघातग्रस्त वाहनांचे टायरही तिथेच पडलेले असतात. तसेच शहरातील बसआगारांमध्येही भंगार वाहने उभी असतात आणि वाहनांचे टायरही इतरत्र पडलेले असतात. या भंगार वाहनांबरोबरच त्याठिकाणी पडलेल्या वाहनांच्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊन साथरोग पसरण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांसह बसआगार प्रमुखांना नोटीसा दिल्या असून त्यात भंगार वाहनांमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस ठाणे आणि बसआगारातील भंगार वाहनांबरोबरच त्याठिकाणी पडलेल्या वाहनांच्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आणि बसआगारांना नोटीसा दिल्या आहेत. आहे. त्यात साथरोगार कारणीभूत असणाऱ्या डासांची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. – डॉ. प्रसाद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका.

नौपाडा, उथळसर, वर्तकनगर, चितळसर मानपाडा, कळवा, डायघर, वागळे, मुंब्रा आणि कासारवडवली हि पोलिस ठाणी तर वागळे, खोपट, वंदना, मानपाडा, कळवा, आनंदनगर, कोपरी, ठाणे एसटी बस स्थानक या बस आगारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, कासारवडवली मेट्रो कार शेड, सीपीतलाव कचरा हस्तांतरण केंद्र, सीपी तलाव कार्यशाळा, भंगारवाले, टायरवाले आणि नर्सरी यांनाही पालिकेने नोटीसा धाडल्या आहेत.