ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या ३३ प्रभागांच्या प्रारुप रचनेविरोधात केवळ एकूण २६९ तक्रारी दाखल झालेल्या असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १२२ तक्रारी एकट्या दिवा परिसरातून दाखल झालेल्या आहेत. त्याखालोखाल घोडबंदर भागातून ५९ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट भागातील प्रभागांमधून मात्र एकही तक्रार दाखल झालेली नाही. या तक्रारींवर उद्या , बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली होती. करोना काळात जणगणना झालेली नसल्यामुळे २०११ साली झालेल्या जनगणनेनुसारच प्रभाग रचना करण्यात आली आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीप्रमाणेच आताच्या निवडणुकीसाठी एकूण ३३ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा करण्यात आला असून चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत ३३ प्रभागांसाठी केवळ २६९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

तक्रारींची आकडेवारी

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांसाठी केवळ २६९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १२२ तक्रारी एकट्या दिवा परिसरातून दाखल झालेल्या आहेत. त्याखालोखाल घोडबंदर भागातून ५९ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभागांमधून ४२, मुंब्रा भागातून ८, कळवा भागातून ४, लोकमान्य-सावरकरनगरमधून ३, उथळसरमधून १७, वर्तकनगरमधून १३ आणि सर्व प्रभागांची मिळून एक, अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वागळे इस्टेट भागातील प्रभागांमधून मात्र एकही तक्रार दाखल झालेली नाही. प्रभागांची रचना करताना विचारात घेण्यात आलेली लोकसंख्या आणि प्रभागांच्या बदललेल्या सीमा या संदर्भातील तक्रारींचा समावेश असून बहुतांश तक्रारींचे तक्रारदार वेगवेगळे असले तरी पत्रातील मजकूर सारखाच असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

प्रभाग रचना तक्रारींवर उद्या सुनावणी

ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २६९ तक्रारींवर उद्या , बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे. या संदर्भात तक्रारदारांना पालिकेने पत्र पाठवून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही सुनावणी प्रक्रीया पार पडणार असून ही सुनावणी सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत होणार आहे.