ठाणे : मुंबई, नवी मुंबई तसेच पालघर भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर आणि उड्डाण पुलांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होऊ लागली होती. परंतु पाऊस सतत सुरू असल्याने खड्डे भरणीत अडथळे येत होते. दरम्यान, गुरूवारी सकाळी पाऊसाने विश्रांती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरणीची कामे हाती घेतल्याचे चित्र दिसून आले.
उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहने घोडबंदर मार्गावरून वाहतूक करतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. याशिवाय, घोडबंदर भागातील नागरिकांची वाहने याच मार्गे वाहतूक करतात. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. यंदाही हे चित्र कायम आहे. घोडबंदर मार्ग आणि त्यावरील उड्डाण पुलांवर डांबरी रस्ता आहे. काही वर्षांपुर्वी मास्टीक पद्धतीने पुलावरील रस्ता तयार करण्यात आला होता.
मात्र, सततच्या अवजड वाहतूकीमुळे तसेच पावसामुळे हा रस्ता उखडत आहे. काही दिवसांपुर्वी घोडबंदर मार्गावरील माजिवाडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ पुलांवर मोठे खड्डे पडले होते. हे खड्डे मास्टीकच्या साहाय्याने बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. माजिवाडा पुल, वाघबीळचा पुल याठिकाणी मोठे खड्डे आहेत.
या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत होती. परंतु पाऊस सतत सुरू असल्याने खड्डे भरणी करणे शक्य होत नसल्याचे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, गुरुवार सकाळपासून ठाणे शहरात पावसाने विश्रांती घेतली असून दुपारी शहरात ऊनही पडले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने घोडबंदर मार्ग आणि त्यावरील पुलांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. माजिवाडा, वाघबीळ या पुलांवर खड्डे भरणीची कामे सुरू होती. डांबरच्या साहाय्याने खड्डे भरणीची कामे करण्यात येत होती.
तिन्ही प्राधिकरण एकत्रित
ठाणे महापालिका क्षेत्रातून घोडबंदर मार्ग जात असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. तसेच या मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यामुळे या मार्गावरील खड्डे भरणीच्या कामासाठी या तिन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या असून यानंतर तिन्ही प्राधिकरणाचे अधिकारी एकमेकांशी समन्वय साधून खड्डे भरणीची कामे करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.