कल्याण : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कल्याण-शीळ मार्गावर रविवारी सलग तिसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी झाली. या वाहतुक कोंडीमुळे कल्याण, डोंबिवली, ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. कोंडी सुटत नसल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडली. रात्री ७.३० नंतरही वाहतुक कोंडी कायम असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण शीळ मार्गावरून हजारो वाहन चालक नवी मुंबई, महापेच्या दिशेने वाहतुक करतात. जड वाहनांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. शुक्रवार आणि शनिवारी या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याने नागरिक बेजार झाले होते. नारळी पौर्णिमा, रक्षा बंधनाच्या सणांच्या दिवशी झालेल्या या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. रविवारी देखील वाहन चालकांना कोंडीचा फटका सहन करावा लागला. येथील काटई ते खिडकाळी, देसाई गावापर्यंत अरूंद असलेला शीळ रस्ता, मेट्रोची कामे यामुळे कोंडी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शीळ फाटा, कल्याण फाटा मार्गावर वाहतुक कोंडी झाली. वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर कापण्यासाठी सुमारे एक तास लागत होता. वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक सुरु केल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाहतुक कोंडीमुळे नवी मुंबईहून कल्याण किंवा ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे आणि ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर येथून नवी मुंबई, शीळाफाटा येथे वाहतुक करणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वाहतुक कोंडी सलग तिसऱ्या दिवशी झाल्याने प्रवासी आणि वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. शिळफाटा येथील वाहतुक कोंडीचा परिणाम दहिसर मोरी पर्यंत झाला होता.
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा दिवसही कोंडीत
नारळी पौर्णिमेनिमित्त शहरांच्या विविध भागात रस्ते अडवून निघालेल्या मिरवणुका. पावसाने अचानक लावलेली हजेरी. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले. तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे एकाच वेळी एकाच दिवशी नागरिक अधिक संख्येने पर्यटन, समुह पध्दतीने आपल्या बहिणीच्या घरी रक्षाबंधन करण्यासाठी निघाले होते. या सगळ्या एकाचवेळी घडलेल्या घटनांनी शुक्रवारी संध्याकाळपासून कल्याण शहर, कल्याण शीळ रस्ता, पनवेल ते डोंबिवली रस्त्यावर कोंडी झाली. तसेच शनिवारी देखील या मार्गावर अशीच काहीशी परिस्थिती होती. रविवारही कोंडीत गेल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे.