ठाणे : दुचाकी चालक उपस्थित असतानाही त्याच्या दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केल्याबद्दल त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दक्ष नागरिकावरच द्वेषाने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर ठाणे पोलिसांच्या वाहतुक शाखेने कारवाई केली. संबंधित कर्मचाऱ्यास वाहतुक नियंत्रण शाखेत संलग्न करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिले.
पोलीस हवालदार मार्तंड भेरे असे त्यांचे नाव आहे. ठाणे शहरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांना वाहतुक पोलीस टोईंग करुन नेत असतात. एखादा वाहन चालक टोईंग वाहनाजवळ उभा असतानाही त्याचे वाहन टोईंग करुन वाहतुक शाखेच्या उपविभाग कार्यालयात नेले जाते. त्यामुळे त्या वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. दक्ष नागरिक रोहीत जोशी यांनी केलेल्या आरोपानुसार ते १८ ऑक्टोबरला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास रोहीत जोशी कळवा नाका येथे आपल्या मोटारसायकलने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी पाहिले की कंत्राटी टोइंग व्हॅनचे दोन कर्मचारी (ज्यांनी ओळखपत्र परिधान केले नव्हते) रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका दुचाकीला टो करत आहेत.
प्रकरण काय होते
दुचाकीचा मालक तात्काळ घटनास्थळी पोहोचला आणि त्याने टोइंग व्हॅनच्या चालकाला विनंती केली की त्याचे वाहन सोडावे, कारण तो जागेवरच दंड भरण्यास तयार होता. मात्र, टोइंग व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या वाहतूक हवालदाराने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि टोइंग व्हॅनचा चालक वाहन घेऊन पुढे निघून गेला. हे पाहून, दुचाकीचा मालक हताश होऊन टोइंग व्हॅनच्या मागे धावू लागला, हे दृश्य अत्यंत चिंताजनक होते. टोइंग व्हॅनच्या मागे धावताना तो पडल्यास गंभीर जखमी होऊ शकत होता किंवा व्हॅनखाली चिरडला जाण्याचा धोका होता.
या संभाव्य मोठ्या दुर्घटनाप्रसंगी, रोहित जोशी यांनी नागरिक म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मोटारसायकलवरून टोइंग व्हॅनला ओव्हरटेक केले आणि व्हॅनच्या समोर आपली दुचाकी लावून तिला थांबण्यास भाग पाडले. वाहन मालक जागेवर दंड भरण्यास तयार असताना चालकाने व्हॅन का थांबवली नाही? असा प्रश्न जोशी यांनी विचारला, तसेच हवालदार यांनी स्वतः घटनास्थळी दंड का वसूल केला नाही? असेही विचारले. त्यामुळे चिडलेल्या हवालदार यांनी जोशी यांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली.
जोशी यांनी दावा केला आहे की, त्यांनी कोणतीही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले नव्हते, उलट त्यांनी एका नागरिकाला संभाव्य अपघातापासून वाचवले होते. असे असतानाही त्यांना १ हजार २५० रुपये दंड बजावण्यात आला. मात्र, जोशी यांचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडली आणि कोणाही वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले नाही. उलट, टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी आणि हवालदाराने नियमांचे पालन केले नाही. या घटनेमुळे ठाणे वाहतूक पोलिसांच्या कंत्राटी टोइंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही अशा टोइंगच्या घटनांमुळे नागरिकांना अपघात झाल्याची उदाहरणे आहेत, ज्यावर न्यायालयांनी गंभीर दखल घेतल्याचा आरोप जोशी यांनी केला होता. रोहित जोशी यांनी या चलानविरोधात कायदेशीररित्या आव्हान दिले असून, या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती.
वाहतुक पोलिसांचे आदेश
वाहतुक पोलिसांनी रोहीत जोशी यांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस हवालदार मार्तंड भेरे यांची बदली वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात केली.
