Thane news – ठाणे : येथील पोखरण रस्ता क्रमांक दोन भागातील वसंत विहार नाक्यावरील सिग्नलजवळील रस्त्यावरच गणेश मुर्ती विक्रीसाठी भल्या मोठा मंडप उभारण्यात आल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता या भागातील नवीन समस्येने वाहनचालक हैराण झाले आहेत. या सिग्नल यंत्रणेला खेटूनच एक भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. हा ध्वज वाऱ्याने फडत असताना सिग्नल झाकोळला जातो आणि त्यामुळे वाहनचालकांना सिग्लनवरील दिव्यांचे इशारेच दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे येथील पोखरण दोन परिसरात वसंत विहारचा भाग येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा हा परिसर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या भागाचे महत्व गेल्या काही वर्षात वाढले आहे. येथील घरांची मागणी गेल्या काही वर्षात वाढली आहे. यामुळे गेल्या काही वर्षात या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिककरण झाले आहे. या भागात म्हाडाच्या वसाहती आहेत. पोखरण रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर येथील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला होता. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे.

आधीच मंडप उभारणीमुळे कोंडी, त्यात…

ठाणे महापालिका क्षेत्रात सण आणि उत्सव रस्त्यावर साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणे आणि काहीवेळेस कार्यक्रमांसाठी रस्ते अडविणे असे प्रकार सुरू होते. अशा प्रकारांमुळे वाहतूक कोंडी होते. असे असतानाच आता गणेशमुर्ती विक्रीसाठी रस्त्यावर मंडप उभारण्याचा प्रकार सुरू झाला असून अशाच एका मंडपाने वसंत विहार भागातील रहिवाशांची वाट अडविल्याचे चित्र दिसून येत आहे. वसंत विहार सिग्नलजवळ असलेेल्या मंडपामुळे कोंडी होत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच आता नवीन समस्येमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत.

सिग्नलजवळच झेंड्याची उभारणी

वसंत विहार नाक्यावर काही दिवसांपासून सिग्नल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात लांब मंडपामुळे परिस्थिती आणखी जिकीरीची झाली आहे. हा रस्ता मंडपामुळे अरुंंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. असे असतानाच, या सिग्नल शेजारीच भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. वाऱ्याने हा ध्वज फडकत असताना, सिग्नलवरील दिव्यांचे इशारे वाहनचालकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण होत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस आणि पालिकेकडून पाहणी

वसंत विहार नाक्यावरील सिग्नलजवळील उभारण्यात आलेल्या ध्वजामुळे सिग्नलवरील दिव्यांचे इशारे दिसत नसल्यामुळे वाहतूक नियोजनात अडथळे येत आहेत. हि बाब लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या पथकासोबत या भागाची पाहाणी केली. तसेच याठिकाणी झेंडा लावणाऱ्यांना त्यांनी काही सुचना केल्या आहेत. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. सिग्नल यंत्रणेजवळ लावलेला झेंडा दुसऱ्या ठिकाणी लावण्यात यावा किंवा त्याची उंची वाढविण्यात यावी, अशा सुचना झेंडा लावणाऱ्यांना दिल्या आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.