ठाणे : अवैध खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या एकास गुन्हे शाखा वागळे युनिट ५ ने अटक केली आहे. या कारवाईत ४१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून, खैर लाकूडने भरलेला ट्रक नितीन नाका मार्गे माजिवाडा दिशेने जाणार आहे. या माहितीच्या आधारे सापळा रचून हा ट्रक थांबवण्यात आला. ट्रकचालक अनिलकुमार रामचंद्र गुप्ता (५४) यास अटक करण्यात आली. हा धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ३१ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीचे १०.५ टन वजनाचे अवैध खैर लाकडाचे ओंडके आढळून आले. तसेच १० लाख रुपये किंमतीचा ट्रक असे एकूण ४१ लाख ७५ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.