ठाणे : एका महिन्यात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ०५ दुचाकी आणि ०२ रिक्षा अशी सात वाहने लांबवणाऱ्या कळव्यातील एका सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाखांची वाहने जप्त केली असून ठाणे शहर पोलिस दलातील ६ आणि ग्रामीण पोलिस दलातील १ असे सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. अटकेतील चोरट्यावर यापूर्वी ०५ कापूरबावडी आणि ०१ कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

करण बाळु आढाव (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ‘मास्टर की’च्या मदतीने या आरोपीने ही वाहने चोरी केली होती. खारेगाव परिसरातून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली रिक्षा १२ सप्टेंबर २०२५ रोजी चोरी केली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हयासंदर्भात वरिष्ठांनी तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत ठाणे गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा समांतर तपास करताना, तपासामध्ये घटनाथळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हा ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री रिक्षा चोरी करून घेऊन गेल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दयांनद नाईक आणि पोलिस हवालदार संदिप महाडीक यांना निष्पन्न झाले. आरोपीने ज्या दिशेने रिक्षा पळवून नेली त्या दिशेने ठाण्यातील माजीवाडा आणि घोडबंदर रोड परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळाला आणि त्याला १५ सप्टेंबर ला अटक करण्यात आले.

पुढील तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्या कौशल्यपूर्ण तपासात आरोपीने केवळ या रिक्षा चोरी प्रकरणातच नव्हे, तर ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण सहा वाहन चोरीचे गुन्हे केल्याचेही निष्पन्न झाले. तर हा आरोपी आपल्या ताब्यात असलेल्या ‘मास्टर की’ चा वापर करून रस्त्याच्या कडेला उभी केलेली ऑटो रिक्षा व मोटारसायकली सुरू करून त्यांची चोरी करीत असल्याची समोर आले. मागील एका महिन्याच्या कालावधीत आरोपीने कळवा, नौपाडा, कापुरबावडी, खडकपाडा व गणेशपुरी (ठाणे ग्रामीण) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल २ ऑटो रिक्षा आणि ५ मोटारसायकली अशी एकूण ७ वाहने चोरी केल्याचे समोर आले आहे.