ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवते. पण, यंदा पावसाळ्यातही ही समस्या कायम असल्याने नागरीक आता आंदोलने करत आहेत. अशाचप्रकारे कळव्यातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्ष आक्रमक झाला असून या पक्षाच्यावतीने आज, मंगळवारी कळव्यातील भीषण पाणीटंचाई विरोधात ढोल वाजवा आंदोलन करण्याबरोबरच मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोर्चा निघणार असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.

शहरात विविध ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तरीही शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवत असून त्याविरोधात आता पावसाळ्यात आंदोलने करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्यावतीने आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता कळव्यातील भीषण पाणीटंचाई विरोधात कळवा नाका येथे ढोल वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे. याचदरम्यान दुपारी १२ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत कळवा नाका ते कळवा प्रभाग समिती असा २०० ते ३०० लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्य जनता ही भीषण अशा पाणीटंचाईला सामोरे जात आहे. कळवा, खारीगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढं सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही. तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे, ते गढूळ स्वरूपाचे आहे. पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवनामरणाचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.