बारवी काठोकाठ भरले, आंदरमध्येही ६४ टक्के जलसाठा
ऑगस्ट महिन्यातच बारवी धरण भरून वाहू लागल्याने तसेच पुण्यातील आंदर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत आताच जवळपास दुप्पट पाणीसाठा असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांमधील पाणी संकट टळल्यात जमा आहे. बारवी आणि आंदर या दोन्ही धरणात समाधानकारक जलसाठा असला तरी नियोजनाच्या दृष्टीने २० टक्के पाणीकपात पुढील काळातही कायम राहील, अशी माहिती पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिली.
मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि पुणे जिल्ह्य़ातील टाटाच्या आंदर धरणातून उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याद्वारे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे बारवी धरण भरलेच नव्हते. पुण्यातील आंदर धरणातही जेमतेम ५० टक्के इतकाच जलसाठा होता. यंदा मात्र ऑगस्ट महिन्यातच बारवी धरण शंभर टक्के भरले आहे. विशेष म्हणजे चार मीटरने उंची वाढल्याने यंदा बारवीमध्ये ४० टक्के अधिक जलसाठा आहे. तसेच पुण्यातील आंदर धरणातही ६४ टक्के पाणीसाठा आहे. मान्सूनचा एकदीड महिना अजून शिल्लक असल्याने आंदरच्या पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त यंदा तरी ठाणेकरांना भीषण पाणीटंचाई सोसावी लागणार नाही, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

नव्या जलस्रोतांची पाटी कोरीच
मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील नागरीकरणासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या जलस्रोत्र शोधण्याबाबत मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वी शासनाच्या जलसंपदा विभागाने ठाण्यात नव्या जलस्रोत्रांची चाचपणी करण्यासाठी बैठक घेतली होती. त्यानंतर रखडलेला शाई धरण प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने शाई प्रकल्पापुढील अडचणी कायम आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याव्यतिरिक्त नवे जलस्रोत प्रकल्प मार्गी लावण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षी यादिवशी बारवी धरण जेमतेम ५७ टक्के भरले होते. त्यात १०३. २३ दक्षलक्षघन मीटर पाणीसाठा होता. यंदा विस्तारीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन धरणाची उंची वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या कमाल जलसाठय़ापेक्षा यंदा ४० टक्के अधिक पाणी धरणात आहे.
-संजीव सावळे, उपअभियंता, बारवी धरण