ठाणे : शहरात नुकतीच घडलेली एक घटना पुन्हा एकदा रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करते. पत्नीसोबत वाद झाल्याने एका तरुणाने रेल्वे स्थानकात आसरा घेतला, पण त्याला त्या रात्रीचा मोठा फटका बसला. मद्यप्राशनानंतर तो रेल्वे फलाटावर झोपला आणि जाग आली तेव्हा त्याचा तब्बल १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन गायब झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्याने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याआधारे गुन्हा दाखल झाला आहे.
(Central Railway) मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दर महिन्याला शेकडोच्या संख्येने उपनगरीय रेल्वेगाडी, स्थानक परिसरातून मोबाईल फोन चोरीला जात असतात. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जाते. स्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही या सीसीटीव्हीच्या नजरेतून हे चोर स्वत:ला वाचवित चोरीचे प्रकार करत असतात. असाच काहीसा प्रकार एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणासोबत झाला.
तरुणाचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे त्याने मद्याची नशा केली. रात्री त्याने राहण्यासाठी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला. परंतु हाच आसरा त्याला भलताच महागात पडला. त्याच्या खिशातील मोबाईल चोरट्याने चोरी केला. मद्यप्राशनानंतर तो रेल्वे फलाटावर झोपला आणि जाग आली तेव्हा त्याचा तब्बल १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन गायब झाल्याचे दिसून आले.
नेमके काय झाले
ठाण्यात राहणारा ३२ वर्षीय तरुण भिवंडी येथील काल्हेर भागातील एका टी-शर्ट प्रिंटींग कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच्याकडे १४ हजार रुपये किमतीचा वापरासाठी मोबाईल आहे. सोमवारी त्याचे पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे तो सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात गेला. तेथील फलाट क्रमांक चारजवळील एका कट्ट्यावर बसला. त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशात मोबाईल होता. त्याने मद्य प्राशन देखील केले होते. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याला जाग आली असता, त्याच्या खिशातील मोबाईल गायब झाल्याचे आढळून आले. त्याने मोबाईलचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. अखेर त्याने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.