ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी विविध आधुनिक यंत्रणांचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाच, आता ग्रामपंचायतींची परिपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संकेतस्थळावर सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध सुविधा, शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून, ते अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यास चालना दिली. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेतील प्रस्ताव, परिपत्रक आणि नस्ती तयार करताना मोठ्याप्रमाणात होणारा कागदांचा वापर टाळण्यासाठी त्यांनी ई-ऑफीस प्रणालीचा अवलंब प्रशासकीय कामकाजात करण्यावर विशेष भर दिला. या ई ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून एखाद्या प्रस्तावाला मंजुरी देखील ऑनलाईन पद्धतीने दिली जात आहे.
त्यापाठोपाठ आता, ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीचा कारभार डिजीटल व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाची निर्मिती केली जाणार आहे. या संकेतस्थळाच्या मध्यातून ग्रामपंचायतीची परिपूर्ण माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. यामध्ये मालमत्ता कर, पाणी पट्टी कर याच्यासह जमा खर्च, स्वामित्व मालमत्ता कार्ड, नमुना ८ तसेच ग्रामपंचायत स्तरावरील माहिती, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांची माहिती आदी माहिती उपलब्ध असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणानंतर संकेतस्थळ कार्यान्वित
ग्रामपंचायतीचे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर माहिती कशी समाविष्ट करावी, संकेतस्थळ कसे हाताळावे, असे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिल्यानंतर संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.