ठाणे –करोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत असून ठाणे आणि कल्याण महापालिका क्षेत्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत का, याची तपासणी करत आहेत.

करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून देशभरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, ठाणे आणि कल्याण शहरात करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे पुन्हा करोना थैमान घालणार का, अशी भिती सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सर्तक झाले असून त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासंदर्भात, सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तालुकास्तरीय आरोग्य अधिकारी आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येत असेल अशा रुग्णांची तात्काळ करोना चाचणी करावी, त्यात एखादा रुग्ण करोना बाधित आढळला तर त्याची लक्षणे बघून त्याच्यावर गृहविलगीकरणात की, रुग्णालयात उपचार करायचे हे ठरवायचे आहे. त्यासह, त्या रुग्णाचे नाव, पत्ता, वय, सहव्याधी असल्यास त्याची माहिती, करोना लसीकरणाचा अहवाल अशी सर्व माहिती गुगलशीट वर तयार करायची आहे, अशा सुचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरोघरी नागरिकांचे सर्वेक्षण

ग्रामीण भागात अद्याप तरी करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. परंतू, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात घरोघरी नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात, नागरिकांना सर्दी, खोकला किंवा ताप आहे का याची तपासणी केली जात आहे. या सर्वेक्षणाला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये संक्षयित रुग्ण आढळून आल्यास त्यांची तात्काळ करोना चाचणी करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली.