शहापूर : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी बुधवारी सुमारे १० किमी पायपीट करत भर पावसात शहापूर तालुक्यातील दापुरमाळ या आदिवासी पाड्याची पाहणी करत तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. मुंबईपासून सव्वाशे किमी अंतरावरील शहापूर तालुक्यातील दापूर माळ गावात रस्ता नसल्याने पायपीट केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना या भागात सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.
रस्ता, वीज, नसल्याने शहापूर तालुक्यातील दापूर माळच्या ग्रामस्थांना सुमारे १० किलोमीटर पायी प्रवास करून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्या ठिकाणाहून बाजार हाट किंवा रुग्णालय असा प्रवास करावा लागतो, ही गंभीर परिस्थिती बघून ते अवाक झाले.
दापूर माळच्या ग्रामस्थांना डोंगर दरी, नाल्यांतून पायपीट करावी लागते. गावात एखादा व्यक्ती आजारी पडलेला असल्यास किंवा एखाद्या गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आल्यास त्यांना झोळी करून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. रस्ताच नसल्याने दापूर माळ या गावासह शहापूर तालुक्यातील ६८ गावांचा विकास झालेला नाही. त्यात दापूर माळची अवस्था वाईट आहे. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव याठिकाणी पाहायला मिळतो. याबाबतची भयाण परिस्थिती लक्षात घेऊन बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी पावसात डोंगर दरींतून वाट काढत पायपीट करत दापूर माळ गाठले होते.
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी वस्ती असलेल्या दापूर माळ गावात घुगे यांनी पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाविना अचानक आणि थेट गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण होते. घुगे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश दिले.
दुर्गम भागांतील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे असे रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या पायी भेटीमुळे प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.