ठाणे: दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. दोन दिवसांपुर्वी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत संकेतस्थळावर सराव सत्र होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींना सामोरे जावे लागले होते. मात्र, प्रत्यक्ष नोंदणी आणि महाविद्यालय पसंतीक्रम भरत असताना देखिल सर्व्हर डाऊनमुळे प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद झाल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.५७ टक्के इतका लागला. यात सर्वाधिक निकाल हा मुलींचा असून ९६.६९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली.
ठाणे जिल्ह्यातून एकूण ४५४ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. उत्तम गुण मिळवत पसंतीचे महाविद्यालये मिळावे अशी सर्वांची इच्छा असते. परंतू, महाविद्यालयातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पार पडत असते. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय मिळणार की नाही याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते.
आजपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास तयार होते. मात्र, अचानक वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाली असून प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेशासाठीचे वेळापत्रक
दिनांक | तपशील |
१९ ते २० मे | सराव सत्र सुरू झाले होते. |
२१ ते २८ मे | प्रत्यक्ष नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरण्यास सुरूवात |
३० मे | तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर |
३० मे ते १ जून | हरकती व दुरुस्ती प्रक्रिया |
३ जून | अंतिम गुणवत्ता यादी जाहीर |
५ जून | गुणवत्तायादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी) |
६ जून | वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
६ ते १२ जून | Proceed for Admission पर्यायाद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे |
१४ जून | दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर |
ठाण्यातील अथर्व जयेश वगळ हा बालकलाकार देखिल यंदा दहावीची उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याने सराव सत्र सुरू असताना वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्यावेळी देखिल अनेक त्रुटी आणि अडचणी आल्या. त्यामुळे प्रत्यक्ष नोंदणीच्या दिवशी कोणतीही समस्या येऊ नये यासाठी त्याने सीएमओला या ट्विट अकाऊंटवर दोन दिवसांपुर्वी ट्विट केले होते. यामध्ये ऑनलाईन प्रवेश भरण्याची सराव सत्र प्रक्रिया सुरु आहे. यात विद्यार्थ्याना नोंदणी करताना अनेक त्रुटी व अडचणी येत आहेत, वेबसाईट हँग होत आहे. २१ मे रोजी प्रत्यक्ष अर्ज भरताना पुन्हा याच समस्या निर्माण होऊ शकतात कृपया यावर उपाय करावा, असे सांगितले होते.