ठाणे: महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही महिन्यांपुर्वी केलेल्या घोषणेनंतरही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुरू होऊ शकलेले नाही. या केंद्रासाठी आवश्यक डाॅक्टर आणि कर्मचारी जाहिरात देऊनही उपलब्ध होत नसून यामुळे ही सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी महाविद्यालय आहे. हे रुग्णालय पाचशे खाटांचे आहे. याठिकाणी दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. ठाणे जिल्ह्यासह पालघर तसेच इतर भागातून हे नागरिक येथे उपचारासाठी येतात. या रुग्णालयात २४ तास शवविच्छेदनांची सुविधा उपलब्ध नाही. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते. दिवसाला तीन ते चार मृतदेहांचे रुग्णालयातील प्राध्यापकांमार्फत शवविच्छेदन करण्यात येते. यामुळे रात्री मृत पावललेल्या रुग्णांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सकाळीच केले जाते. तोपर्यंत त्याच्या कुटूंबियांना आणि नातेवाईकांना ताटकळत रहावे लागते. हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा उपस्थित झाला आणि त्यानंतर या रुग्णालयात २४ तास शवविच्छेदनांची सुविधा देण्याचे ठराव लोकप्रतिनिधीनी केले.

हेही वाचा… विद्युत वाहनांसाठी शहाड येथे चार्जिंग हब; कल्याण-डोंबिवली परिसरात ६४ चार्जिंग केंद्र उभारण्याच्या हालचाली

परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. या रुग्णालयात काही महिन्यांपुर्वी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर २४ तास शवविच्छेदन सुविधेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारले होते. दरम्यान, रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुरू होईल, अशी घोषणा आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यावेळेस केली होती. परंतु काही महिन्यांपुर्वी केलेल्या या घोषणेनंतरही रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुरू होऊ शकलेले नसून रात्रीच्या वेळेत हे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सद्यस्थितीत प्राध्यापकांमार्फत शवविच्छेदन करण्यात येत असून ते कार्यालयीन वेळेत हे काम करतात. यामुळे २४ तास शवविच्छेदन सुविधा सुरू ठेवण्यासाठी डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी यापुर्वी काढलेल्या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पुन्हा जाहिरात काढण्यात येत असून त्यातून डाॅक्टर आणि कर्मचारी उपलब्ध होताच २४ तास शवविच्छेदन सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली