बहुप्रतिक्षित मुरबाड रेल्वेला गती मिळणार; प्रकल्पाच्या ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी | The much awaited Murbad railway will gain momentum State Government guarantees 50 Percent of the cost of the project msr 87 | Loksatta

बहुप्रतिक्षित मुरबाड रेल्वेला गती मिळणार; प्रकल्पाच्या ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

railway-track
(संग्रहीत छायाचित्र)

बहुप्रतिक्षित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज (सोमवार) दिले. त्यामुळे या टिटवाळा मुरबाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील मोठा भाग आजही रेल्वे मार्गाने जोडला गेला नसल्याने विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे टिटवाळा किंवा उल्हासनगरपासून रेल्वेमार्ग मुरबाड तालुक्यातील गावांना जोडावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या मार्गामुळे कल्याण तालुक्यातील अनेक गावेही जोडली जातील. त्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणता येईल. यासाठी मुरबाडपर्यंत रेल्वेची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.

गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता –

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या मार्गाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. मात्र यावर पुढे ठोस काहीही झाले नव्हते. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता.

शीळफाटा रस्त्यावरील गृहसंकुलातील विद्यार्थ्यांचे वाहन कोंडीमुळे हाल

मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत आज भेट घेतली. यावेळी नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विनंती करण्यात आली. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सुचनाबसंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत – कपिल पाटील

या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2022 at 17:11 IST
Next Story
ठाणे : कोपरी प्रभाग समितीच्या इमारतीचा बाहेरील सज्जा पडला