ठाणे: राज्याच्या नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेंतून ६८ आपला दवाखाने सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. या दवाखान्यांसाठी पालिकेने २२ ठिकाणी जागा निश्चित केल्या असून त्यापैकी एक ठिकाणी म्हणजेच रामनगर भागात एक दवाखाना सुरू केला आहे. उर्वरित ४६ ठिकाणी दवाखाने उभारणीसाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

ठाणेकरांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी आणि तीही परिसरातच यासाठी ठाणे महापालिकेने आपला दवाखाना उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात ४५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य विभागाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेंतून ६८ दवाखाने सुरू करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेला दिले आहे. या दवाखान्यांच्या उभारणीपासून ते डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

हेही वाचा… जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्वाचे; अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिकेला केवळ शहरात जागा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभागाने दवाखाने उभारणीसाठी जागांचा शोध सुरू केला असून त्यामध्ये शहरातील २२ ठिकाणी जागा शोधण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामध्ये खिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा, मानपाडा, सावरकरनगर, वागळे इस्टेट, ढोकाळी, दिवा या भागातील जागा आहेत. त्यापैकी एक ठिकाणी म्हणजेच रामनगर भागात एक दवाखाना सुरू केला आहे. सांयकाळी ५ ते रात्री १० यावेळेत हे दवाखाने सुरू असणार आहेत. उर्वरित ४६ ठिकाणी दवाखाने उभारणीसाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.