स्थानिक नगरसेवक, नागरिकांशी संवाद; प्रतिबंधित क्षेत्रांनाही भेटी
ठाणे : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारपासून संपूर्ण शहराचा प्रभाग समितीनिहाय दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्काही दिवसांपुर्वी करोना रुग्णांमुळे संवेदनशील बनलेल्या लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्राचा दौरा करून त्यांनी तेथील प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी दिल्या. तसेच स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे आयुक्त रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात दररोज दीडशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीका होत होती. असे असतानाच राज्य शासनाने तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची अचानकपणे बदली करून त्यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली. शर्मा यांनी बुधवारी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्वच अधिकाऱ्यांकडून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारपासून संपूर्ण शहराचा प्रभाग समितीनिहाय दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून त्यांनी शहराच्या दौऱ्याला सुरुवात केली असून पहिल्या दिवशी त्यांनी लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्राचा दौरा केला. त्या दरम्यान त्यांनी हणमंत जगदाळे व दिगंबर ठाकूर या स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात करोनाचे किती रुग्ण आहेत, कोणते कार्यक्रम राबविले जात आहेत याची माहिती घेतली. त्याचबरोबर लोकमान्यनगर सावरकरनगरमध्ये सुरू असलेल्या फिव्हर क्लिनिकला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधून नेमके कशाप्रकारे काम चालते याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रांची पाहाणी केली. तसेच नागरिकांशीही संवाद साधला.