ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या दसरा सणानिमित्ताने ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. दसरा सणाच्या काळात झेंडू आणि शेवंतीच्या फुलाला विशेष मागणी असल्यामुळे या फुलांची मोठी आवक झाली असून त्याचबरोबर या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति किलोमागे झेंडूचे फुल ४० रुपये तर, शेवंती फुल ८० रुपयांनी महागले आहे, अशी माहिती ठाण्यातील फुल विक्रेत्यांनी दिली.

ठाणे स्थानकाजवळच फुलांचा मोठा बाजार भरतो. येथे फुल खरेदी करण्यासाठी नागरिक येतात. सणांच्या काळात याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. नवरात्रौत्सवाच्या कालावधीत झेंडूच्या फुलांची माळ तयार करुन देवीला वाहिली जाते. या कालावधीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याने त्याची मोठ्याप्रमाणत आवक होते. दसऱ्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते.

हेही वाचा… ठाणे : विहिरीत पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका

यादिवशी घर,वाहन, दागिने खरेदी करण्यात येतात. त्याचबरोबर झेंडूच्या फुलांचे तोरण दारावर बांधले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दोन दिवस आधीपासूनच नागरिक फुलांची खरेदी करतात. यंदाही हे चित्र कायम आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. प्रति किलो मागे झेंडूचे फुल ४० रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर हार तयार करण्यासाठी शेवंतीच्या फुलाचा वापर केला जात असून हि फुले सुद्धा महागली आहेत. या फुलाच्या दरात प्रतिकिलो मागे ८० रुपयांनी वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी ६० ते ८० रुपये प्रति किलोने विक्री होणाऱ्या झेंडूच्या फुलांनी आता शंभरी ओलांडली, तर, ५० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारा नामधरी झेंडू सध्या ७० रुपये किलोने विक्री केला जात आहे. तर, शेवंतीच्या फुलांनाही दसऱ्याच्या दिवशी मोठी मागणी असते. १२० ते १५० रुपये प्रति किलोने विक्री केली जाणारी शेवंती सध्या २०० रुपये प्रति किलोने विक्री केली जात असल्याची माहिती ठाण्यातील फुल विक्रेत्यांनी दिली.

सध्याचे फुलांचे दर (प्रति किलो)

फुलेदोन ते तीन दिवसापूर्वीसध्या
लाल झेंडू६० ते ८०१०० ते १२०
पिवळा झेंडू६० ते ८०१०० ते १२०
नामधारी झेंडू४० ते ५०६० ते ७०
शेवंती१२० ते १५०२००
गुलाबी शेवंती८० ते १००१६०