ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या मिरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. या रस्त्याचे डांबरीकरण आज, १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत केले जाणार होते. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर महत्त्वाचे वाहतुक बदल लागू केले होते. अखेर हे वाहतुक बदल रद्द करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी दिली.
ठाणे, वसई, विरार, मिरा भाईंदर, गुजरात, बोरीवली, दहिसर येथे वाहतुक करणाऱ्या वाहन चालक, नोकरदारांसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा आहे. तसेच गुजरात व वसई परिसरातून उरणमधील जेएनपीए बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतुक प्रामुख्याने याच मार्गावरून वाहतुक करतात. परंतु पावसाळ्यात गायमुख घाटात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील वाहने भिवंडी-काल्हेर, मुंबई नाशिक महामार्ग, चिंचोटी पर्यायी मार्गावरून वाहतुक करु लागली. वाहनांचा भार आल्याने या सर्व मार्गावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत पर्यायी मार्गांवर प्रवाशांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. या रस्त्याची दुरुस्ती झाली असून मार्गावर डांबरिकरण केले जाणार होते. त्यासाठी १५ ऑगस्ट रात्री १२.०१ वाजता ते १८ ऑगस्टला पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले होते.
अवजड वाहनांना गायमुख घाटात बंदी लागू करुन या वाहनांची वाहतुक मुंबई नाशिक महामार्ग, वाडा भिवंडी रस्ता, चिंचोटी, कशेळी काल्हेर मार्गाने होणार होती. त्यामुळे मोठी वाहतुक कोंडी या मार्गावर झाली असती. सलग सुट्ट्यांचे दिवस असल्याने नागरिक मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता असून कोंडीची भिती व्यक्त केली जात होती.
म्हणून काम रद्द
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस पडत आहे. घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याचे काम अर्धवट पूर्ण झाले असून आता या मार्गावर डांबरिकर केले जाणार होते. परंतु पावसामुळे या कामास अडथळे येण्याची शक्यता असल्याने ठाणे शहर पोलिसांच्या वाहतुक विभागाने आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस दलाने वाहतुक बदल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाहतुक बदल लागू केले असते तर सुट्ट्यांच्या दिवसात कामानिमित्त किंवा सहलीला निघालेल्या नोकरदारांचे कोंडीमुळे हाल झाले असते. पोलिसांकडून आता नव्याने केव्हा वाहतुक बदल लागू केले जातील याबाबत स्पष्टीकरण मिळालेले नाही.