ठाणे: ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या नुकत्याच अंतर्गत बदल्या आणि बढत्या झाल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या, बढत्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे काही पोलीस अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष तर काही पोलीस अधिकाऱ्यांना प्रभावी पोलीस ठाणे मिळाले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्याकाही दिवसांपासून बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. नुकत्याच नौपाडा, नारपोली, कासारवडवली या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. या बदल्या ताज्या असतानाच १५ अधिकाऱ्यांच्या पुन्हा अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांची मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची नियंत्रण कक्षात, हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांची हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. तर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. नियंत्रण कक्षाचे महेश पाटील आणि अजय आफळे यांची शहर वाहतुक शाखेत बदली झाली आहे.

हेही वाचा… मध्य रेल्वेच्या ढिसाळपणामुळे प्रवासी मेटाकुटीला; रोजच्या ७० फेऱ्या रद्द, शेकडो लोकल विलंबाने

शहर वाहतुक शाखेचे उमेश गिते यांची टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांची शहर वाहतुक शाखेत आणि कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे यांची नारपोली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या पाच साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या गुन्हे अन्वेषण शाखेत बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, निजामपुरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माने, मुख्यालयातील उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब कोल्हापुरे यांचा सामावेश आहे.