कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरात पादचारी वृध्द, ज्येष्ठ नागरिक महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणार एक टोळी सक्रिय आहे. अलीकडे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाप्रकारे पादचाऱ्यांना लुटणारे चोरटे अटक केले आहेत. तरीही या टोळीतील काही सदस्य डोंबिवली, कल्याण शहर परिसरात सक्रिय आहेत. कल्याण पश्चिमेत वालधुनी पूल भागात एक पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरट्याने हिसकावून लुटून नेली.

गेल्या महिनाभरात चार ते पाच महिलांना या चोरट्यांनी रस्त्यात एकटे गाठून त्यांंच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज हिसकावून नेला होता. यामधील काही चोरटे मानपाडा पोलिसांनी अटक केले आहेत. भुरट्या चोरट्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे महिला वर्गात विशेषता ज्येष्ठ नागरिक, वृध्द महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणारे महिला, पुरूष गळ्यात, हातात सोन्याचा ऐवज न घालता घराबाहेर पडत आहेत. गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरट्यांकडून हिसकावताना यापूर्वी अनेक महिलांच्या मानेला गंभीर दुखापती झाल्या आहेत. बोटातील अंगठी काढताना धारदार शस्त्राचा वापर केल्याने काही पादचाऱ्यांच्या बोटाला दुखापती झाल्या आहेत.

कल्याण पूर्वेतील लोकधार संकुल भागात राहणाऱ्या नोकरदार महिला उषा थंंपी या बुधवारी संध्याकाळी कल्याण पश्चिम भागातून रेल्वे काॅलनी भागातून वालधुनी पुला खालून पायी चालल्या होत्या. उषा यांच्या गळ्यात ५० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी होती. वालधुनी परिसरात फिरणाऱ्या एका ३० वर्ष वयाच्या भुरट्या चोराच्या उषा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी नजरेस पडली. त्यानंतर उषा यांना काही कळून न देता या भुरट्याने उषा यांचा काही वेळ पादचारी असल्या सारखा पाठलाग केला. उषा थंपी या कर्षण वितरण डेपो ऑफिस जवळून कल्याण पश्चिम येथून जात असताना भुरट्या चोरट्याने अचानक पाठीमागून उषा यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची सात ग्रॅम वजनाची पन्नास हजार रूपये किमतीच सोन साखळी हिसकावली.

अचानक घडलेल्या या हालचालींमुळे काही क्षण उषा गोंधळल्या. चोरट्याने सोन साखळी हिसकावताना मानेला हिसका बसल्याने त्यांना आपल्या गळ्यातील सोन साखळी चोरट्याने हिसकावल्याचे लक्षात आले. त्यांनी काही वेळ ओरडा केला. पण चोरटा वेगाने पळून गेला होता. या चोरी प्रकरणी उषा थंपी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार साळुंखे याप्रकरणाचा तपास करत आहेत.