ठाणे : जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (४५) आणि राजकुमार रामफेर पांडे (५४) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला घरगुती वादविवाद असल्यामुळे मानसिक तणावात होती. या तणावात असताना, ती ६ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मौजे शिळगावातील घोळ गणपती परिसरात आली. संपूर्ण रात्र ती या परिसरात होती. या महिलेला श्यामसुंदर, संतोषकुमार आणि राजकुमार यांनी पाहिले. तिचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तिघांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला. चहा पिताच तिला भांगेची नशा चढली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेवून या तिघांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. या महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, या तीन आरोपींनी त्या महिलेस मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केली.

हेही वाचा…ठाणे : तीन जखमी रुग्णांची भर पावसात दोन किलोमीटर झोळीतून वाहतूक, शहापूर मधील घटना

मृत महिलेची ओळख कशी पटली ?

शिळ डायघर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने मंगळवारी मौजे शिळगावात घोळ गणपती मंदिराच्या जवळ एका महिलेचा मृतदेह दिसल्याचे कळविले. या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी गेले असता, त्यांना अर्धनग्न अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या शरिरावर जखमा होत्या. या मृत महिलेचे छायाचित्र घेवून आजुबाजूच्या पोलीस ठाण्यात शोध घेतला असता, नवी मुंबई येथील एन.आर. आय पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आल्याचे समजले. तेव्हा या मृत महिलेची ओळख पटली.

हेही वाचा…कल्याण : सेक्रेड हार्ट शाळेच्या संचालकाला विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींचा शोध कसा ?

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिळडायघर पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने तसेच सीसीटिव्ही चित्रीकरणाच्या आधारे या गुन्ह्याचा सखोल तपास केला. या तपासात घोळ गणपती मंदिराचे गौशाळा आणि मंदिर परिसरात सेवा करणारे संतोषकुमार आणि राजकुमार या सेवकांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा करताना त्यांच्यासह श्यामसुंदर हा व्यक्ती देखील असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू, हा व्यक्ती गुन्हा दाखल झाला त्यादिवशी सायंकाळी मुंबई येथे निघून गेला होता. पोलीसांनी याचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन त्याला मुंबईतील ट्रॉम्बे या परिसरातून ताब्यात घेतले. या गुन्ह्याची माहिती कोणाला समजू नये यासाठी या तिन्ही आरोपींना घोळ गणपती मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणाची केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीसांनी सांगितले.