मध्य रेल्वे मार्गिकेवरील कसारा-इगतपूरी रेल्वे मार्गिकेवर आज (मंगळवार) रात्री इंजिनचे तीन चाके रुळांवरून घसरली. या घटनेमुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने वाहतूक करणारी आणि कसाऱ्याहून कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.

मध्य रेल्वेच्या कसारा- इगतपूरी मार्गावर घाटातून लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यासाठी जोड इंजिन वापरले जाते. मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास हे इंजिन कसाऱ्याहून इगतपूरीच्या दिशेने जात होते. इंजिन कसाऱ्याजवळील रेल्वे उड्डाणपूलाजवळ आले असता इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही चाके रुळांवर आणण्यासाठी प्रशासनाने ओव्हरहेड तारेमधील विद्युत प्रवाह बंद केला होता. त्यामुळे येथील इगतपूरीच्या दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती. कसारा-आसनगाव या रेल्वे स्थानकांदरम्यान हावडा दुरांतो आणि पंचवटी या लांब पल्ल्यांच्या गाड्या उभ्या होत्या. तर, या खोळंब्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे वाहतूकीवरही झाला. त्यामुळे कल्याण, ठाणे आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक प्रवासी दोन तासांहून अधिकवेळ रेल्वेगाड्यांमध्ये उभे होते. महिला प्रवाशांचे यामुळे सर्वाधिक हाल झाले. मुंबईच्या दिशेकडील रेल्वे गाड्यांच्या वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला. रात्री उशीरापर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाकडून इंजिन रुळांवर आणण्याचे काम सुरू होते.