ठाणे : मुंब्रा येथील कौसा भागात रविवारी सायंकाळी दुचाकीच्या विजेरीचा (बॅटरी) स्फोट होऊन तीन महिला जखमी झाल्या. नुसरत सय्यद (४५), हफजा सय्यद (२४) आणि अफजा सय्यद (१८) अशी जखमींची नावे असून त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजल्याने दुखापत झाली आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कौसा येथे पाच मजली इमारतीच्या तळघरात दुचाकीची विजेरी होती. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या विजेरीचा अचानक स्फोट होऊन आग लागली. घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात नुसरत, हफजा आणि अफजा हे तिघे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या चेहरा आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी महिला ३० टक्के भाजल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच स्फोटामुळे घरातील इलेक्ट्रीक उपकरणांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते.