ठाणे महापालिकेची नियंत्रण समिती स्थापन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमांची, निवडणुकीसाठी उमेदवारांनी कोणती कागदपत्रे सादर करावीत आणि आचारसंहितेचे पालन कसे करावे, याची माहितीही यावेळी दिली. दरम्यान या निवडणुकीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून प्रत्येक प्रभागनिहाय निवडणुकीसाठी उमेदवारांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या काळात अनेकदा विविध कारणांमुळे वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरात आचारसंहिता लागू झाली असून या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून निवडणूक अधिकारी व आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक गुरुवारी घेतली.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या बैठक कक्षात घेण्यात आलेल्या या बैठकीला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अशोक रणखांब, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे आणि पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांची माहिती आयुक्त जयस्वाल यांनी बैठकीत दिली. तसेच नामनिर्देशन पत्र सादर करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, नमुना अ आणि नमुना ब कधी सादर करावे लागणार, मालमत्ता शपथपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र कधीपर्यंत सादर करू शकतो, निवडणूक खर्चाचे विवरण कधी सादर करावे आणि आचारसंहितेमध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतची तपशीलवार माहितीही त्यांनी दिली.

नामनिर्देशनपत्र ऑनलाइन

महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज ऑनलाईनद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानंतर त्याची प्रत शपथपत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी लागणार असल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन कसे भरावे याचे प्रशिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc election
First published on: 20-01-2017 at 01:47 IST