ठाणे : विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर (टोकदार उपकरणे) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे ‘टायर किलर’ बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> कल्याण : आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर ;आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे रखडणार असल्याने वाहन मालक अस्वस्थ

विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने अपघात, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर’ बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर बसविल्याबाबतचे माहिती फलक १०० ते २०० मीटर अंतरावर लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाशझोत असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जातील. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मागील दोन आठवड्यांत घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मोबाईल वापरण्यास दिला नाही म्हणून तरूणीची आत्महत्या

वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकाशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. तसेच, सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर, १२.५ टन वजन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली. दीडशे ते दोनशे टन वजनाची वाहने गायमुख घाटातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली. हा मार्ग आता मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या वळण रस्ता, विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकेलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे सेवा रस्ते दुरूस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.