ठाणे : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील ३५० कंत्राटी बस वाहकांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार पहाटेपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे टीएमटीच्या १०० बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे ठाणे सॅटीस पूलावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांबरोबरच प्रवाशांचे हाल होणार आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील व्यावसायिक योगेश दामले यांचे निधन

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूकीसाठी प्रवाशांकडून टीएमटी बसगाड्यांचा वापर सर्वाधिक होतो. टीएमटीमध्ये कंत्राटी पद्धतीने वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोख वेतन मिळावे, महापालिकेने ठरवलेले वेतन मिळावे, थकबाकी मिळावी अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. प्रशासनाकडून ठोस उत्तरे मिळत नव्हती. यामुळे त्यांनी शुक्रवार पहाटेपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात २३५ पुरुष तर १२५ महिला बस वाहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे परिवहन सेवेवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत धोकादायक इमारत कोसळली, पालिकेने आधीच दिली होती नोटीस

परिवहन सेवेच्या तीनशे बसगाड्या दररोज प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होतात. परंतु संपामुळे शंभर बसगाड्यांची वाहतूक बंद होती. आधीच प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आणि त्यात संपामुळे जेमतेम २०० बसगाड्या रस्त्यावर होत्या. यामुळे स्थानक परिसरातील सॅटीस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. टीएमटीच्या शहरातील इतर बस थांब्यावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. घोडबंदर भागातील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. बसगाड्या वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. महिला प्रवाशांना त्याचा फटका बसला. टीएमटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबत विनंती करत होते. परंतु सायंकाळी उशीरापर्यंत त्यांनी संप मागे घेतला नव्हता.