ठाणे : देशात जे वाईट घडते त्याची चर्चा अधिक होते, परंतु देशात ४० पट अधिक चांगले काम सुरू आहे. मी हे फिरताना बघतो, पण ज्यांचे डोळे आणि कान उघडे आहेत, त्यांना ते दिसते. अनेक जण नि:स्वार्थ भावनेतून चांगले काम करीत आहेत. ठाण्यातील कर्करोग रुग्णालय हे त्यापैकीच एक काम आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले. शिक्षण आणि आरोग्य सुविधांबद्दल सरसंघचालक म्हणाले, ‘‘आजच्या काळात शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. सर्वानाच वाटते, चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. त्या सर्वसामान्यांना स्वस्त आणि आपल्या परिसरातच उपलब्ध व्हायला हव्यात.’’

ठाणे येथील बाळकूम-साकेत भागातील महापालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, दादा भगवान फाऊंडेशनचे दीपक देसाई, जीतो ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर आदी उपस्थित होते.

कर्करोग रुग्णालयेही उभी राहायला हवीत. कारण, हे शुभ, शिव आणि सत्य कार्य आहे. त्यामुळे लोकांचे कल्याण होईल आणि वातावरणही चांगले राहील, असे नमूद करून सरसंघचालक म्हणाले, ‘‘कार्य हे संवेदनेतून झाले पाहिजे, लाभाची अपेक्षा नसेल तरच चांगले काम होते. जीवसेवा ही शिवसेवा आहे. त्या भावनेतून काम करायला हवे. दु:ख सर्वाच्या जीवनातून दूर व्हावे, या प्रेरणेतून काम करणे, हीच खरी संवेदना असते.’’ शासन, समाज, जितो यांसारख्या संस्था संवेदनशील आहेत म्हणून उत्कृष्ट काम होत आहे. पण, ज्यांच्यासाठी आपण सेवा करतोय, त्यांनाही विचारायला हवे. त्यांना दिलासा कसा मिळेल, या दृष्टीने काम व्हायला हवे, ही अपेक्षा आहे आणि ती भविष्यात पूर्ण होईल. यातूनच समाजाला विश्वास मिळेल, असेही भागवत म्हणाले.

करोनाकाळात इतर देश मोडून पडले पण, आपल्या देशाच्या बाबतीत असे घडले नाही. कारण सर्व एकजुटीने उभे राहिले. डॉक्टर, कर्मचारी, संस्था, समाज अशा सर्वानी मिळून करोना नावाच्या राक्षसाचा प्रतिकार केला. संकट होते पण, आपण एकटे नाही, अशी भावना सामान्यांमध्ये निर्माण झाली, असे निरीक्षणही सरसंघचालक भागवत यांनी नोंदवले. 

महत्त्वाचा क्षण : मुख्यमंत्री शिंदे

रुग्णालयाच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यात इतरांच्या आनंदाचा विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दु:ख कमी करण्याचे काम केले, ते माझे गुरू आनंद दिघे यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मला दु:खाच्या काळात दिघे यांनीच सावरले. धर्मवीरांनी अनेकांना नव्याने उभे राहण्याची प्रेरणा दिली. दव्या बरोबरच दुव्याची गरज असते. म्हणूनच येथे रुग्णालयाबरोबर त्रिमंदिर उभारले जात आहे, असेही ते म्हणाले.

जैन समाजात सेवेसाठी निधी दानाचे तत्त्व : फडणवीस

देशाचा जीडीपी जैन समाजाकडे आहे. त्यांच्या श्रमातून आणि मेहनतीतून हे घडले आहे. केवळ पैसा कमवायचा नाही, तर तो सेवेसाठीही द्यायचा  हे तत्त्व  जैन समाजात पाळले जाते, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कर्करोग कुटुंबातल्या एका व्यक्तीला होतो, मात्र त्रास संपूर्ण कुटुंबाला सोसावा लागतो. कुटुंबाचे आर्थिक संतुलन बिघडते. त्याचा विपरीत परिणाम देशाच्या श्रम शक्तीवर होतो, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक शतकांपासून आपला देश जगातल्या मागास आणि दबावात असलेल्या राष्ट्रांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आपला देश विश्वाचा मुकुट व्हावा. – मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ