ठाणे : पावसाळ्यानिमित्ताने गेल्याकाही दिवसांपासून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या, महाविद्यायीन तरुण-तरुणींनी सहलींचे बेत आखले आहेत. तर काही जणांनी अद्याप आखले नाही. व्यस्थ जीवनामुळे मुंबई, ठाण्यात नोकरी असल्याने अनेकांना मुंबई महानगराबाहेर दोन ते तीन दिवस सुट्ट्या घेऊन फिरायला जाता येत नाही. पण ठाणे, मुंबईच्या आसपास असे अनेक पर्यटन आणि छुपी स्थळ आहेत, जिथे एका दिवसात परतून सहलीचा आनंद घेऊ शकता. एकाच दिवसात परत (वन-डे रिटर्न) असे अनेक ठिकाण मुंबई आणि ठाण्याच्या आसपास उपलब्ध आहेत.
१) कर्जत – ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेला कर्जत तालुका निसर्गरम्य आहे. या भागात फार्म हाऊस, रिसाॅर्ट मोठ्याप्रमाणात आहे. प्रसिद्ध माथेरान हे थंड हवेचे ठिकाण देखील येथेच असल्याने कर्जतमध्ये फिरण्यासाठी मुंबई, ठाण्यातील अनेकजण जातात. माथेरानसह तुम्हाला आषाणे धबधबा देखील गाठता येऊ शकतो. हा भाग वन-डे रिटर्न पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. ठाण्याहून अवघ्या दीड ते दोन तासांच्या अंतरावर कर्जत स्थानक आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेलगतच्या शहरातील अनेकजण येथे जातात.
कसे जाल- कर्जत, खोपोली या रेल्वेगाड्या कर्जत स्थानकात थांबतात. माथेरानसाठी याच मार्गावरील नेरळ तर आषाणे धबधब्यासाठी भिवपूरी रोड किंवा कर्जत रेल्वे स्थानकात उतरावे लागेल. तिथून पुढे रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे.
२) केळवे- ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात केळवे समुद्र किनारा हा फिरण्यासाठी उत्तम पर्यटनस्थळ आहे. समुद्र किनाऱ्याबाहेर अनेक हाॅटेल आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थही उत्तम मिळतात. येथे देखील रिसाॅर्ट, फार्म हाऊस आहेत. परंतु त्याची किंमत थोडी महाग आहे. विशेष म्हणजे, या समुद्र किनाऱ्यावर मुंबईतील समुद्र किनाऱ्याप्रमाणे गर्दी नसते. तसेच समुद्र किनारा देखील जास्त प्रदूषित नाही. तुम्हाला येथे शंख,शिंपले देखील पाहायला मिळतील. समुद्र किनाऱ्यालगत एक मंदिर देखील आहे.
कसे जाल – मुंबई ठाण्याहून जाण्यासाठी दादर रेल्वे रेल्वे स्थानकातून डहाणू रेल्वे गाडीने केळवे स्थानक गाठता येते. तिथून मिनीडोरने तुम्ही केळवे समुद्र किनारी जाऊ शकाल. किंवा ठाण्याहून बोरीवली बसगाडीने बोरीवली येथे उतरून बोरीवली रेल्वे स्थानकातून डहाणू रेल्वे गाडीने केळवे गाठता येईल.
३) माहुली गड – गिर्यारोहणाची आवड असलेल्यांसाठी शहापूरातील माहुली गड हा एक चांगला पर्याय आहे. माहुली गड हा शहापूर तालुक्यात आहे. अनेकजण या ठिकाणी या गडाला भेट देतात. खासगी वाहनाने देखील हा भाग गाठू शकतो. परंतु वाहने उभी करण्यास अडचण येऊ शकते. गडावर काही ठिकाणी जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे वन विभागाकडून खात्री करुनच हा पर्याय निवडा.
कसे जाल- मुंबई ठाण्याहून रेल्वे गाडीने निघाल्यास कसारा किंवा आसनगाव रेल्वेगाडीने आसनगाव रेल्वे स्थानकात उतरा. तिथून रिक्षा किंवा राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्यांनी माहुली गाठता येईल.
४) कोंडेश्वर – बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १० ते १२ किमी अंतरावर कोंडेश्वर वसले आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. येथे कोंडेश्वर मंदीर देखील आहे. सध्या कोंडेश्वर येथील कुंडामध्ये उतरण्यास बंदी आहे. परंतु कोंडेश्वर परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. तेथे तुम्ही भेट देऊ शकाल. येथील भोज धरणाला देखील पर्यटक भेट देत असतात.
कसे जाल- मुंबई, ठाण्यातून जाताना बदलापूर, कर्जत, खोपोली रेल्वेगाडीने बदलापूर स्थानकात उतरु शकता. तेथून रिक्षाने कोंडेश्वर गाठता येते.
५) बारवी धरण – बारवी धरण येथील परिसर देखील पाहण्यासारखा आहे. शहाराच्या व्यस्थ आयुष्यातून निवांतपणा हवा असल्यास बारवी धरणाचा परिसर पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे देखील बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाने जाता येते.
६) माळशेज- माळशेजचा घाट पाहण्यासाठी मुंबई ठाण्यातील पर्यटक गर्दी करतात. माळशेजच्या घाटात डोंगरातून पडणारे पाणी, निसर्गाचे सौंदर्य येथे अनुभवता येते. माळशेज घाटात जाण्यासाठी खासगी वाहनाने गेल्यास सहल उत्तम होऊ शकते.