कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन मालकांनी आपली चारचाकी वाहने उभी केली आहेत. ही वाहने अनेक महिने जागेवरुन हलविण्यात येत नाहीत. त्यामुळे या वाहनांच्या परिसरात पालिका कामगारांना सफाई करता येत नाही. या वाहनांमुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. अशा सर्व वाहनांची माहिती जमा करुन अशा वाहनांवर नोटिसा लावून कारवाई करण्याची मोहीम कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक विभागाने सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नोकर भरतीतील फसवणूक टाळण्यासाठी भिवंडी पालिकेचे नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ज्या रस्त्यावर एखादे वाहन अनेक दिवसांपासून उभे केले आहे. ते वाहतुकीला अडथळा करते. अशा वाहनांची माहिती वाहतूक विभागाला नागरिकांनी दिली तर अशा वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई करणार आहे, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डोंबिवलीमध्ये वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या, वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक दिवसांपासून उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाईच्या नोटिसा लावून वाहन जप्तीची तंबी वाहन मालकाला दिली आहे. अशाच प्रकारची कारवाई कल्याण पूर्व भागात कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सुरू केली आहे. कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालया समोरील मोकळ्या जागेत परिसरातील सोसायटीतील रहिवासी आपली चारचाकी वाहने आणून उभी करत होती. त्यामुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या वाहनांमध्ये पालिेकेतून निवृत्त झालेल्या एका साहाय्यक आयुक्ताचे वाहन नेहमी उभे असते. या पालिका अधिकाऱ्यालाही वाहतूक विभागाने तंबी देऊन मोकळ्या जागेतून वाहन हटविण्याचे आदेश दिले. वाहतूक विभागाच्या या आक्रमक कारवाईमुळे कोळसेवाडी भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा- थकीत वीज ग्राहकांचा अभय योजनेला प्रतिसाद नाही; ३१ डिसेंबरपर्यंत विलासराव देशमुख अभय योजना लागू असणार

कल्याण पश्चिमेत वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर बहुतांशी वाहन मालकांना वाहने हटविण्यास भाग पाडण्यात आले आहे. जे वाहन चालक वाहने हटवत नाहीत. त्यांच्या वाहनांना कारवाईच्या नोटिसा लावून वाहने न हटविल्यास जप्तीची कारवाई करण्याची तंबी दिली आहे, असे कल्याण पश्चिम वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.

रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने त्या भागात सकाळच्या वेळेत साफसफाई करता येत नाही. त्या वाहनाखाली पालापाचोळा असल्याने वारा आला की तो परिसरात उडतो. एखाद्या वाहनाची नियमित देखभाल केली जात नसल्याने त्या वाहनावर धुळीचा थर साचतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. वाहतूक विभागाने सुरू केलेल्या कारवाईबद्दल पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा- डोंबिवली: चोरीला गेलेले चार लाख रुपये किंमतीचे ३७ मोबाईल हस्तगत; मानपाडा पोलिसांची कामगिरी

“अनेक इमारतींना वाहनतळ नसते. त्या इमारतीमधील वाहने परिसरातील रस्त्यांवर उभी केली जातात. इतर भागातील वाहन चालक वर्दळीच्या जागेत वाहने आणून उभी करतात. काही वाहन मालक वाहने जागेवरची हलवत नाहीत. अशा वाहन मालकांवर कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic department notice to owners of four wheelers parked on busy roads in kalyan dombivli municipal limits from several months dpj
First published on: 06-12-2022 at 16:09 IST