लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील पश्चिमेतील रेल्वे मैदाना जवळील गणेश नगर भागात मागील २० दिवसांपासून २० ते २५ फूट लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अरूंद असलेल्या रस्त्यावर काम सुरू असल्याने आठ फुटाच्या एकाच मार्गिकेमधून वाहने धावत असतात. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होत आहे.

या रस्त्याच्या बाजुला असलेल्या रस्त्यावरील डांबरीचा थर निघाला आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे धूळ हवेत उडते. गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, गणेशनगर, कुंभारखाणपाडा, चिंचोड्याचापाडा भागातील वाहने या रस्त्यावरून डोंबिवली पूर्व भागात वाहतूक करतात. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ठेकेदाराने या रस्त्याची खोदाई केली. हा रस्ता आठवडाभरात पूर्ण होईल, असे प्रवाशांना वाटले होते.

आणखी वाचा-सिलेंडर स्फोटाने मुंब्रा हादरले; तीन जण जखमी, अनेक घरांच्या काचा फुटल्या

अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्याने प्रवाशांना या भागात दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या रस्ते कामामुळे या भागात असलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. रस्ते कामासाठी दुकानासमोर खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना दुकानात येण्यासाठी जागाच नाही, अशा तक्रारी येथील व्यावसायिकांनी केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर अभियंता विभागाने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होईल आणि धूळ उडणाऱ्या रस्ते काँक्रीट किंवा डांबरी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.