ठाणे : ठाणे येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आदिवासी मोर्चामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावर पाचपाखाडी ते माजिवडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोर्चामुळे ठाण्याहून मुंबईत कामानिमित्ताने वाहनाने निघालेल्या नोकरदारांना वाहतुक कोंडीचा फटका सहन करावा लागला. माजिवडा ते कोपरी हे १० ते १५ मिनीटांचे अंतर कापण्यासाठी चालकांना पाऊण तास लागत होता. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी काही चालकांनी ठाण्यातील अंतर्गत मार्गाचा पर्याय निवडला. त्यामुळे अंतर्गत मार्गावर भार वाढून या मार्गावरही कोंडी झाली होती.

नाशिक येथून सकल आदिवासी विकास या संस्थेने विविध मागण्यांसाठी मुंबई पर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा पूर्व द्रुतगती महामार्गावर आल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. घोडबंदर, भिवंडी, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातून हजारो नागरिक पूर्व द्रूतगती महामार्गाने मुंबई गाठतात. परंतु मोर्चामुळे मंगळवारी सकाळी पाचपाखाडी ते माजिवडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती.

मोर्चा कॅडबरी उड्डाणपूलावरून गेल्याने कोंडीत आणखी भर पडली. वाहन चालकांना १० ते १५ मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी सुमारे पाऊण तास लागत होता. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सोमवारी रात्री देखील या मोर्चामुळे कोंडी झाली. मंगळवारी सकाळी कॅडबरी उड्डाणपूलाजवळ एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे देखील कोंडीत भर पडली होती.

वाहन चालकांनी महामार्गाची कोंडी टाळण्यासाठी खोपट मार्गे महामार्ग गाठण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मार्गावरही वाहनांचा भार वाढून काहीप्रमाणात कोंडी झाली होती.

महामुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून विविध प्रकल्प, पोलिसांच्या असमन्वयामुळे अवेळी सुटणारी अवजड वाहतुक, रस्त्यांची दुरावस्था यामुळे वाहतुक कोंडी वाढू लागली आहे. घोडबंदर, मुंबई अहमदाबाद मार्गावरील प्रवास खडतर झाला आहे. या वाहतुक कोंडीतून मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.