तीन महिन्यांत ६ कोटी ३० लाख रुपये वसूल
ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड थकीत ठेवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ डिसेंबर २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ६ कोटी ३० लाख ५६ हजार १५० रुपयांची दंडवसुली केली आहे. राज्यात सर्वाधिक थकीत दंड वसूल करण्यात आल्याचे ठाणे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या अख्यत्यारीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. दोन वर्षांपासून ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलान या प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये नियम मोडणाऱ्या चालकांच्या वाहनांच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून दंड आकारत असतात. संबंधित दंडाच्या रकमेचा संदेश वाहनचालकाच्या मोबाइल क्रमांकावर जात असे. यामध्ये नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला दंडाची रक्कम केव्हाही भरण्याची मुभा आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरत नव्हते. त्यामुळे कोट्यवधीचा दंड थकीत होता. ठाणे पोलिसांनी हा थकीत दंड वसूल करण्यास १ डिसेंबर २०२० पासून सुरुवात केली आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलिसांनी ६ कोटी ३० लाख ५६ हजार १५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. त्यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सिग्नल ओलांडणे, रस्त्याकडेला कार उभी करणे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरात करण्यात आली असून या ठिकाणी ३ कोटी १५ लाख ८६ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवलीत १ कोटी ३५ लाख ५३ हजार ७५०, भिवंडी शहरात १ कोटी ७ लाख ७० हजार १५० आणि उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात ६७ लाख ९९ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर उर्वरित दंड विविध यंत्रणांद्वारे वसूल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी राज्यातील इतर भागांतील पोलिसांच्या तुलनेत सर्वाधिक दंड वसूल केल्याचा दावा केला जात आहे.
